कुंभार्ली घाटात 95 लाख रुपयांची दारु पकडली; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुंभार्ली घाटामध्ये पोफळी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महाराष्ट्र राज्य मुंबईच्या भरारी पथकाने छापा टाकून एका ट्रकमधून होणारी 95 लाख रुपयांची दारु पकडली आहे. या ट्रकसह ट्रकसोबत असणारी ह्युंडाई आय 10 ही कार उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे. कारवाईत 1 कोटी 23 लाख 3 हजार रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महाराष्ट्र राज्य मुंबईच्या भरारी पथकाला चिपळूण कराड महामार्गावरील कुंभार्ली घाटातून दारु वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार घाटामध्ये ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये 180 मिली क्षमतेच्या 48 सीलबंद बाटल्यांनी भरलेला 1350 बॉक्समध्ये अवैध विदेशी मद्यसाठा सापडला. ट्रकसोबत जाणारी ह्युंडाई आय 10 गाडी व ह्युंडाई क्रेटा कार अशा दोन चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत एकूण 95 लाखांची दारु जप्त करण्यात आली. केदारसिंग धनसिंग (वय 26, ट्रकचालक, रा. राजस्थान), पवनकुमार राजेश पटेल (वय 29, रा.इंदौर मध्यप्रदेश), प्रदिप पाटील (वय 47, रा.सावंतवाडी), प्रकाश पाटील (वय 47, रा.सावंतवाडी), अर्जुन कवठणकर (वय 23, रा.सावंतवाडी), रोहित साळगावकर, (वय 25, रा.सावंतवाडी), मंदार साळगावकर, (वय 29, रा.सावंतवाडी) यांना अटक करण्यात आली आहे.