
सामना ऑनलाईन। ठाणे
प्रवाशांनी जीव धोक्यात घालून रेल्वेरूळ क्रॉस करू नये यासाठी रेल्वेतर्फे अनेक जाहिरातींमधून जनजागृती केली जाते. पण लोकांवर त्याचा काहीही परिणाम होत नसल्याचे समोर आले आहे. सोमवारी दिवा रेल्वे फाटक ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना समोरुन येणाऱ्या एक्सप्रेसने उडवले. यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दोघेही तरुण दिवा गावातील आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
सोमवारी सकाळी हे दोघे अॅक्टीव्हा या दुचाकीवरुन जात होते. ते दिवा रेल्वे फाटकजवळ आले. पण या मार्गावरुन एक्सप्रेस जाणार असल्याने अनेकजण फाटकाजवळ थांबले होते. पण या तरुणांना फाटक ओलांडण्याची घाई होती. यामुळे समोरून एक्सप्रेस येत असल्याचे दिसत असतानाही ते रेल्वे रूळ क्रॉस करू लागले. पण वेगात येणाऱ्या एक्सप्रेसने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात या दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला.




























































