
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती रंजन गोगोई हे त्यांचे उत्तराधिकारी असतील, असे संकेत केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिले.
न्यायमूर्ती गोगोई हे पुढचे सरन्यायाधीश असतील काय, असा थेट प्रश्न कायदामंत्र्यांना विचारण्यात आला होता. त्यावर रविशंकर प्रसाद यांनी विद्यमान सरन्यायाधीश आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करतात. तशी परंपराच आहे, असे सांगतानाच सरकारच्या हेतूवर संशय घेऊ नका, असेही ते म्हणाले.
सध्याचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या प्रशासकीय कामकाजावर आणि खटल्यांच्या वाटपांवर चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन सवाल उठवले होते. त्यात न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर, न्यायमूर्ती मदन बी लोकूर, न्यायमूर्ती पुरियन जोसेफ आणि न्यायमूर्ती रंजन गोगोई यांचा समावेश होता.
फाइल सरकारकडे आहे
न्यायमूर्तींच्या नियुत्यांसाठी तयार करण्याच्या ‘मेमोरंडम् ऑफ प्रोसिजर’बाबतही रविशंकर प्रसाद यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, त्यावर चर्चा सुरू आहे. काहीही निर्णय अजून झालेला नाही. सरन्यायाधीशांच्या अधिपत्याखालील ‘कॉलेजियम’ने आपली शिफारस पाठवली आहे, पण फाइल सरकारकडे आहे.























































