
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
इतरांची पापं धुणाऱ्या गंगेची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. मोक्षदायिनी म्हटल्या जाणाऱ्या गंगेमध्ये प्लास्टिक, हाडं, कचरा, मानवी विष्टा आणि विषारी पाणी मिसळले जात आहे. गंगेमध्ये मिसळल्या जाणाऱ्या या घाणीच्या दुर्गंधीमुळे आणि रोगाला आमंत्रण देणाऱ्या विषाणुंमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. मोदी सरकारने राबवण्यात आलेले ‘नमामि गंगे’ हे अभियान फ्लॉप झाल्याचे दिसत आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये गंगा अधिकच मैली झाल्याचे प्रयोगशाळेमध्ये केलेल्या परिक्षणातून सिद्ध झाले आहे.
‘इंडिया टुडे’ला माहितीच्या अधिकारांतर्गत गंगा नुतनीकरण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गंगा घाटावरील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आले तेव्हा यामध्ये असलेल्या विषाणुंच्या संख्येमध्ये चार वर्षात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गंगेच्या पाण्यातील प्रदुषणामध्ये तब्बल ५८ टक्के वाढ झाली आहे. १ हजार मिलीलीटर पाण्यामध्ये २,५०० पेक्षा जास्त कॉलिफॉर्म (बॅक्टेरिया) असणे घातक समजले जाते. हे पाणी डुबकीसाठीही घातक आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. काशीतील मालवीय पुलाजवळील पाण्याच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली तेव्हा त्यामधील कॉलिफॉर्म (बॅक्टेरिया)चे प्रमाण तब्बल २० पट अधिक असल्याचे स्पष्ट झाले.
माहितीच्या अधिकारांतर्गत देण्यात आलेल्या उत्तरामध्ये सरकारने मान्य केले आहे की मालवीय पुलाजवळील प्रति १०० मिलीलीटर पाण्याच्या नमुन्यांमध्ये ४९,००० कॉलिफॉर्म (बॅक्टेरिया) दिसून आले असून हाच आकडा २०१४ मध्ये ३१,००० इतको होता. तसेच सरकारने केंद्रीय प्रदुषन नियंत्रण बोर्डाच्या माहितीचा दाखला देताना म्हटले की, काशीमध्ये गंगा नदीत पाच मोठ्या गटारींद्वारे दहा लाख लीटरपेक्षाही जास्त पाणी रोज मिसळले जाते. त्यामुळे गंगेच्या प्रदुषणात वाढ होत आहे. तसेच गंगा नदी ही बंगालच्या खाडीमध्ये मिळण्यापूर्वी १०० शहरांमधून वाहत जाते. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यातून दिवसाला १४४ गटारींद्वारे गंगा नदीमध्ये कचरा टाकण्यात येतो, हे सरकारने मान्य केले आहे.
























































