
सामना प्रतिनिधी । मुंबई
शहर भागात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने धरण क्षेत्रावर मात्र यंदा अवकृपा केली आहे. मुंबईच्या रस्त्यांवरून दोन धरणांइतके पाणी पंपिंगच्या सहाय्याने उपसावे लागले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत मात्र अजून म्हणावी तशी भर पडत नाही. पाऊस गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट पडलेला असला तरी पाणीसाठा मात्र गेल्या वर्षीपेक्षा कमी झाला आहे.
शहर आणि उपनगरांत यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत तब्बल सरासरीच्या ६२ टक्के पाऊस पडला आहे. गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट पाऊस शहर आणि उपनगरांत पडला. तलाव क्षेत्रात मात्र पावसाने अजून दमदार हजेरी लावलेली नाही. मुंबईपासून जवळ असलेला तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला असला तरी मुंबईबाहेरील अन्य सहा धरणांकडे पावसाने पाठ फिरवली आहे.
शहर आणि उपनगरांत आतापर्यंत दीड हजार मि.मी. पाऊस पडला आहे. मुंबईपासून जवळ असलेल्या विहार आणि तुळशी तलावात अडीच हजार मि.मी. पाऊस पडला, पण अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा या पाच मुख्य धरणांत मात्र पावसाने हजारचा आकडाही पार केलेला नाही.
गेल्या वर्षीचा पाणीसाठा :
७ लाख ९३८ दशलक्ष लिटर
या वर्षीचा पाणीसाठा :
६ लाख ३६ हजार ८९६ दशलक्ष लिटर
तलाव पूर्ण भरल्यानंतरचा पाणीसाठा :
१४ लाख४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर





























































