
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
शासकीय रुग्णालयात डॉक्टरांचा असलेल्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्यसरकारने वेलनेस क्लिनिक अंतर्गत १७ जिल्ह्यात बीएएमएस डॉक्टर भरण्याचा निर्णय घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल ८० बीएएमएस डॉक्टर भरण्यात येणार असून रत्नागिरी जिल्ह्याच्या वाट्याला भोपळा आला आहे.
रत्नगिरी जिल्ह्यात ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची १३१ पदे रिक्त आहेत.सध्या जिल्ह्यात ६३ डॉक्टर कार्यरत असून २८ बीएएमएस डॉक्टर आहेत. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा राबवताना आरोग्य विभागाची तारांबळ उडत आहे. अनेक ठिकाणी एका डॉक्टरला दोन-दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा द्यावी लागते. वेलनेस क्लिनिक मधून रत्नागिरी जिल्ह्याच्या वाट्याला बीएएमएस डॉक्टरांच्या जागा यायला हव्या होत्या. परंतु पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष झाले आहे.
जिल्ह्यातील डॉक्टर सोडण्याची भीती
रत्नागिरी जिल्ह्यात कंत्राटी पध्दतीने करण्यात २८ बीएएमएस डॉक्टर भरण्यात आले.त्यांना महिना १६ हजार रुपये वेतन देण्यात येते. वेलनेस क्लिनिकच्या माध्यमातून भरती होणाऱ्या बीएएमएस डॉक्टराना २५ हजार पगार आणि वर इंसेंटिव्ही मिळणार आहे.त्यामुळे ३५ ते ४० हजार रुपये वेतन बीएएमएस डॉक्टरना मिळू शकते. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यात काम करणारे डॉक्टर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.




























































