
सामना प्रतिनिधी । मुंबई
गणेशोत्सवात सजावटीसाठी झटपट पर्याय म्हणून सर्वांची पहिली पसंती असते ती थर्माकोलच्या मखरांना. ऐन उत्सवाच्या तोंडावर हायकोर्टाने थर्माकोलवर घातलेल्या बंदीमुळे बाप्पाचे डेकोरेशन करायचे कसे, असा प्रश्न आता सर्वसामान्यांसह मंडळांना पडला आहे. बाजारातील इकोफ्रेंडली मखरांनाही आता डिमांड आले आहे. त्यामुळे घरच्या घरी पडदे, फुलांची आरास करायचे गणेशभक्तांनी ठरवले आहे. तर सार्वजनिक मंडळेही आता इकोफ्रेंडली सजावटीच्या दृष्टीने विचार करत आहेत.
थर्माकोलच्या मखर विक्रीतून केवळ मुंबईत कोटय़वधींची उलाढाल होते. अरुण दरेकर हे दादरला मखरविक्रीचा व्यवसाय करतात. बंदीबाबत ते म्हणाले की, या निर्णयाचा आमच्यासारख्या विक्रेत्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ येणार आहे. ९० टक्के मखर तयार झाले आहेत. या मखरांचे आता करायचे काय, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो; परंतु आम्हाला यंदाच्या उत्सवापुरती सूट मिळायला हवी होती. असेच काहीसे मत दादरच्या जी. बी. विचारे स्टोअर्सच्या प्रभाकर गोडे यांनी व्यक्त केले आहे.
तब्बल ४० हजार लोक या व्यवसायावर अवलंबून असल्याने यंदाच्या वर्षी थर्माकोल मखर वापरण्यास परवानगी द्यावी, अशी आम्ही मागणी राज्य शासनाकडे केली होती. पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेता थर्माकोलच्या मखरांच्या वापराबाबत हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सर्व मंडळांनी आणि घरगुती गणपती आणणाऱया गणेशभक्तांनी इकोफ्रेंडली मखरांचा वापर करावा.
-अॅड. नरेश दहीबावकर, अध्यक्ष, बृहन्मंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती



























































