सर्व्हर डाऊनमुळे अकरावी प्रवेश रखडले, अल्पसंख्याक कोट्याने वाट लावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

ऑनलाइन प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या अल्पसंख्याक कोटय़ातील सुमारे ५० हजारांवर जागा न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा कॉलेजच्या ताब्यात गेल्याने अकरावी प्रवेशाची अक्षरशः वाट लागली आहे. मुंबईतील ७० ते ८० टक्के नामांकित कॉलेज ही अल्पसंख्याक आहेत. पण या कॉलेजमधील जागांवर ऑनलाइन प्रवेश होणार नसल्याने नव्वदीपार विद्यार्थ्यांना दुसऱया यादीत प्रवेशच मिळालेला नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थी-पालकांनी आज शिक्षण उपसंचालक कार्यालयात धाव घेतली. पण येथील अधिकारी विद्यार्थ्यांना शेवटच्या गुणवत्ता यादीपर्यंत वाट पाहण्यास सांगत आहेत.

अल्पसंख्याक कोटय़ातील जागांवर ऑनलाइन प्रवेश न करण्याचा निर्णय दुसऱया गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर जाहीर झाला. केसी, जयहिंद, एचआर, मिठीबाई यांसारख्या अल्पसंख्याक कॉलेजमध्ये दुसऱया यादीसाठी जागा आहेत असे समजून विद्यार्थ्यांनी अर्ज केला, मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर या कॉलेजमधील जागा ऑनलाइनमधून वगळल्या आणि ९० टक्के मिळूनही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले. चिराग भट्टाचार्य या विद्यार्थ्याला ८८ टक्के गुण मिळाले. केसीमध्ये त्याला प्रवेश हवा होता. केसीची पहिली यादी ८९ टक्क्यांवर क्लोज झाली. त्यामुळे दुसऱया यादीत त्याला प्रवेशाची गॅरंटी होती; पण हे कॉलेज अल्पसंख्याक असल्याने दुसऱया यादीसाठी उपलब्ध जागा कॉलेजच्या ताब्यात गेल्या आणि चिरागसारखे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले.

सर्व्हर डाऊन; प्रवेश घेण्याचा दिवस वाया
शुक्रवारी दिवसभर ऑनलाइन प्रवेशाचा सर्व्हर डाऊन असल्याच्या तक्रारी कॉलेजकडून येत होत्या. दुसऱया यादीत प्रवेश मिळालेले जे विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास गेले त्यांचे प्रवेश सर्व्हर डाऊनमुळे ऑनलाइन अपलोड होऊ शकले नाहीत. त्यामुळे बऱयाच विद्यार्थ्यांना माघारी यावे लागले. काही कॉलेजनी विद्यार्थ्यांची ऑफलाइन नोंद करून ठेवली व उद्या शनिवार पुन्हा बोलावले. आता दुसऱया यादीनुसार प्रवेशाचा उद्याचा एकच दिवस शिल्लक असून तिसरी यादी २६ जुलैला सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे.

– पहिल्या गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळूनही प्रवेश न घेतलेले तसेच ९० टक्के गुण मिळूनही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइनच्या नियमित फेऱयानंतर विशेष फेरी राबविण्यात येणार असल्याचे कळते.

पालकांनी मानसिकता बदलायला हवी!
काही कॉलेज मुंबईतील ‘टॉप-१०’ किंवा बेस्ट कॉलेज आहेत. ही मानसिकता पालकांनी बदलायला हवी. अल्पसंख्याक कॉलेजमधील रिक्त जागा ऑनलाइनसाठी उपलब्ध नसल्याने सध्या तरी बऱयाच कॉलेजमधील आर्टस्, कॉमर्सच्या ऑनलाइन प्रवेशाच्या जागा फुल्ल झाल्या आहेत. तिसऱया यादीसाठी उपलब्ध जागांनुसार विद्यार्थ्यांनी पुन्हा कॉलेज पसंतीक्रम भरून प्रवेशाची वाट पाहावी. सर्व कॉलेजमधील शिक्षणाचा स्तर चांगला आहे हेदेखील लक्षात घ्यावे. – डॉ. नरेंद्र पाठक, सदस्य अकरावी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश

– ऑनलाइनची शेवटची यादी जाहीर झाल्यानंतरही जे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतील त्यांना अल्पसंख्याक कोटय़ातील रिक्त जागांवर प्रवेश मिळणार आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयातून विद्यार्थ्यांना चौथ्या यादीपर्यंत वाट पाहण्यास सांगण्यात येत आहे. पण तोपर्यंत प्रवेश मिळेल की नाही. खुल्या प्रवर्गातील जागा शिल्लक राहतील की नाही या तणावात विद्यार्थी आहेत.

विद्यार्थ्यांचा आज मोर्चा
दुसऱ्या गुणवत्ता यादीच्या कटऑफएवढे गुण असूनही प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, ९० टक्के गुण असूनही प्रवेशापासून वंचित राहिलेले विद्यार्थी शनिवारी (२१ जुलै) रस्त्यावर उतरणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशाची आणखी एक संधी द्यावी, गुणवत्तेनुसारच प्रवेश मिळावा या मागणीसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता चर्नीरोड बालभवन ते मंत्रालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे.