नांदेडमध्ये मराठा आरक्षणाची मागणी करत आंदोलनकर्त्याने केली आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अर्धापूर

तालुक्यातील दाभड़ येथील ४० वर्षीय कचरू कल्याणे यांनी आज दुपारी एक वाजता मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा आशयाची चिठ्ठल लिहून आत्महत्या केली. दरम्यान संतप्त जमावाने पंचनामा अडवून धरला. काकासाहेब शिंदेच्या धर्तीवर ठोस मदतीचे तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पंचनाम्यासाठी पार्थिव पोलिसांच्या ताब्यात दिले.

suicide-note-of-kalyan-kach

तालुक्यातील पिंपळगांव येथील प्रल्हाद कल्याणकर गुरुजी यांनी शुक्रवारी रात्री आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज दुपारी एक वाजता दाभड़ येथील कचरू दिगंबर कल्याणे मराठा समाजातील होते. उच्चशिक्षित असूनही ते मजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व तीन मुली असे कुटुंब आहे.

त्यांनी रविवारी दुपारी एक वाजता आई घराच्या बाहेर गेल्यानंतर ‘एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशी चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. आई घरी आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आली. बातमी वार्‍यासारखी पसरली. गावकरी  व परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने जमा झाले. पोलीसही पंचनाम्यासाठी आले पण समाज बांधव व नातेवाइकांनी त्यांना रोखले. मराठा आरक्षणासाठी त्यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. काकासाहेब शिंदेच्या धर्तीवर मदत व वारसाला नोकरी द्यावी हा विषय गावकर्‍यांनी लावून धरला. यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय त्याठिकाणी जमा झाला. शेवटी शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन लेखी आश्वासन दिले.

लेखी आश्वासनामध्ये तहसीलदार यांनी कचरू कल्याणे यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली  असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. तहसिल स्तरावरील सर्व योजनेचा लाभ देण्यात येईल तसेच काकासाहेब शिंदे यांच्या धर्तीवर जास्तीत जास्त मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच सदरील प्रस्ताव तातडीने तयार करून तहसिलचा प्रतिनिधी सोमवारी मुख्यमंत्री यांना सादर करण्यासाठी जाईल, असे म्हणाले. तसेच कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीष जाधव यांनी दहा हजार रूपयांची रोख मदत जाहिर केली व एका मुलीला शिक्षणासाठी व पालकत्व म्हणून दत्तक घेतले.  

समाजाचा संताप अन क्यूआरटी पथक माघारी

पंचनामा होऊ न देण्यासाठी गावकरी व मराठा समाज बांधव संतप्त झाले होते. मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केल्याने पोलिसांनी खबरदारी म्हणून क्यूआरटी पथकाला पाचारण केले. नंतर जमाव अजूनच संताप झाला. “पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करण्याऐवजी आम्हाला क्यूआरटी पथक बोलावून भीती घालत आहे”, असा आरोप करत सर्व खवळले. समाजाचा संताप पाहून आल्या पावली क्यूआरटी पथकाने गावातून माघार घेतली.