पूरग्रस्त केरळमध्ये शिवसेना मदतीसाठी सरसावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । थिरुवनंतपुरम

पुराने उद्ध्वस्त झालेल्या केरळच्या मदतीसाठी शिवसेना सरसावली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक केरळमध्ये दाखल झाले. त्यांच्यासोबत 30 डॉक्टरांचे पथक असून साथीच्या आजारांनी त्रस्त अल्लेपी येथील नागरिकांना तातडीने वैद्यकीय सेवा पुरविण्यात आल्या.

त्याचप्रमाणे पूरग्रस्तांना कपडे, चादरी, तांदूळ, साखर, बिस्किटांचे पुडे, डेटॉल, साबण असे तब्बल 50 टन साहित्य पुरविण्यात आले. खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार बालाजी किणीकर, नगरसेवक तसेच शिवसेनेचे पदाधिकारीही तिथे पोहोचले असून पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी सहकार्य केले जात आहे.

ओनम साधेपणाने साजरा

अतिवृष्टी, महापूर यामुळे केरळमध्ये 265 हून अधिक जणांचे बळी गेले, हजारो घरे कोसळली. मदत छावण्यांमध्ये अद्यापि पावणेनऊ लाख लोक राहत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचा महत्त्वाचा असलेला ‘ओनम’ सण यावेळी अतिशय साधेपणाने केरळवासीयांनी साजरा केला. दरवर्षी घरांपुढे फुलांच्या रांगोळय़ा घालून घरोघरी वेगवेगळे अन्नपदार्थ, विविध प्रकारच्या खास पावसाळी भाज्या, पायसम (खीर) बनवून ओनम जल्लोषात व आनंदात साजरा करण्याची केरळची परंपरा आहे, परंतु यंदा पुराच्या आपत्तीने या सणाला दुःखाची किनार असल्याने सण साजरा करण्यासाठी फारसा उत्साह नव्हता. केवळ परंपरा म्हणून सण उरकला.