SC/ST आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (SC/ST) आरक्षणासंदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाअंतर्गत सोयीसुविधा आणि नोकरीमध्ये फायदा मिळवणारा व्यक्ती एकाच राज्यात या आरक्षणाचा फायदा घेऊ शकणार आहे, इतर राज्यात नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

एसएसी/एसटी कायद्याविरोधात सवर्ण रस्त्यावर, संतप्त आंदोलकांचा रास्ता रोको

गुरुवारी या प्रकरणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, ‘अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी संपूर्ण देशभरात आरक्षण लागू करता यावे, यासाठी नियमांचा विचार करायला हवा. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीत मोडणाऱ्या व्यक्तीला आरक्षणाचा फायदा केवळ एका राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात घेता येणार आहे. एखाद्या राज्यात वास्तव्यास असणारी व्यक्ती अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची असेल, तर तिला त्या राज्यातील आरक्षणाचा फायदा घेता येईल. जोपर्यंत दुसऱ्या राज्यानं त्या जातीला आरक्षण दिलं नसेल, तोपर्यंत संबंधित व्यक्तीला आरक्षणाचा फायदा मिळणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

यआधी एखाद्या राज्यात आरक्षणाचा फायदा घेणारी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील व्यक्ती दुसऱ्या राज्यातही आरक्षणाचा फायदा घेऊ शकते का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आला होता. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने असे होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच कोणत्याही राज्यातील सरकार स्वत:च्या मर्जीप्रमाणे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या यादीत बदल करु शकत नाही. हा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. किंवा राज्य सरकार संसदेच्या सहमतीने यादीत बदल करु शकतात, असे न्यायालयाने म्हटले आहे.

यापूर्वी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (एसएसी/एसटी) कायद्याविरोधात बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये सवर्णांनी निदर्शनं सुरू केल्याचे वृत्त देण्यात आले. गया, बेगूलराय, नालंदा आणि बाढ जिल्ह्यात सवर्ण समाजाचे लोक रस्त्यावर उतरून या कायद्याचा विरोध करत असल्याचे वृत्त आज तक या वृत्तवाहिनीने दिले.