एसएसी/एसटी कायद्याविरोधात सवर्ण रस्त्यावर, संतप्त आंदोलकांचा रास्ता रोको

12

सामना ऑनलाईन । पाटणा

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (एसएसी/एसटी) कायद्याविरोधात बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये सवर्णांनी निदर्शनं सुरू केल्याचे वृत्त आहे. गया, बेगूलराय, नालंदा आणि बाढ जिल्ह्यात सवर्ण समाजाचे लोक रस्त्यावर उतरून या कायद्याचा विरोध करत असल्याचे वृत्त आजतक या वृत्तवाहिनीने दिले आहे.

गया जिल्ह्यात तर रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना हटवण्यासाठी आलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (दलित) कायद्याच्या विरोधात या आंदोलकांनी तुफान घोषणाबाजी करत रस्ते रोखून धरले, त्यामुळे बराच काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यानंतर गयामधील बाजारापेठा देखील बंद करण्यात आल्या. आंदोलकांना रोखण्यासाठी आणि जमावाला पांगवण्यासाठी काही भागात लाठीचार्ज देखील झाल्याची माहिती या वृत्तात देण्यात आली आहे.

बेगूसराय येथे सवर्ण आंदोलकांनी नगर ठाण्यातील काली स्थान चौक, हेमरा चौक आणि मुफसिल ठाण्याच्या परिसरातील मोहनपूर-राजौर रस्ते रोखून धरले आहेत. काही ठिकाणीतर आंदोलकांनी टायर पेटवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. लखीसराय येथे देखील आरक्षण आणि एससी/एसटी कायद्या विरोधात नाराज लोक रस्त्यावर उतरले आहेत. भूमिहार ब्राह्मण एकता मंचाकडून बिहार बंदची हाक देण्यात आली आहे. ज्याचा परिणाम राज्यात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे.

या कायद्याला विरोध करतानाच जातीवर आधारीत नाही तर आर्थिक परिस्थितीवर आधारीत आरक्षण हवं अशी मागणी करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या