
सामना प्रतिनिधी । मुंबई
एका बाजूला रस्त्यांवरच्या मंडळांच्या ऑनलाइन परवानग्या रखडलेल्या असताना गल्लीबोळातील आणि इमारतींमधील गणेशोत्सव मंडळांना अद्याप अग्निशमन दलाची ना-हरकत प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत. विशेषतः लालबाग-परळमधील छोटय़ा छोटय़ा गल्ल्यांमधील मंडळांचे पदाधिकारी परवानग्यांअभावी गॅसवर आहेत. गणेशोत्सवाला पाच दिवस उरलेले असताना अग्निशमन दलाने आपली जबाबदारी ढकलण्यासाठी चालढकल सुरू केली आहे.
रस्त्यांवरच्या मंडळांना परवानगी देण्यासाठी पालिकेने यावेळी ऑनलाइन पद्धत आणली, मात्र त्याव्यतिरिक्त तब्बल दहा हजार मंडळे इमारतींमध्ये किंवा दोन इमारतींच्या मधल्या चिंचोळय़ा गल्ल्यांमध्ये आहेत अशा मंडळांना अग्निशमन दलाची एनओसी आणणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र अग्निशमन दलाकडे प्रत्येक मंडळ पाहण्यासाठी यंत्रणाच नसल्यामुळे या मंडळांना परवानगी देण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाऱयांमार्फत अक्षम्य अशी चालढकल सुरू असल्याचा आरोप मंडळांच्या पदाधिकाऱयांनी केला आहे.
क्रिस्टल टॉवरच्या बाजूच्या इमारतीतील मंडळाला अद्याप परवानगी नाही. परळमधील क्रिस्टल टॉवरला आग लागून त्यात चारजण मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे अग्निशमन दलाने गणेश मंडळांना ना हरकत प्रमाणपत्र देताना ताकही फुंकून प्यायचे ठरवले आहे. मात्र त्यामुळे अग्निशमन दलाचे अधिकारी मंडळांना परवानगी देण्यास टाळाटाळ करत आहेत. क्रिस्टल टॉवरशेजारी असलेल्या सोनस टॉवरमधील 30 वर्षे जुन्या ‘बालमित्र गणेशोत्सव मंडळाला’ अद्याप परवानगी दिलेली नाही.
गल्लीतल्या मंडळांना वाली कोण?
गल्लीतली मंडळे न्यायालयाच्या कचाटय़ात सापडलेली नसली तरी या मंडळांची अग्निशमन दलाने अडवणूक केली आहे. ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही तर मंडप कसा उभारणार? उद्या एखादी दुर्घटना झाल्यास पदाधिकाऱयांना शिक्षा होऊ शकते. त्यामुळे गल्लीतल्या मंडळांना कोणी वाली नाही अशीच परिस्थिती आहे.
-बाळासाहेब न्यायनिर्गुणे, बालमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ
शुल्क भारंभार, परवानगीसाठी मात्र चालढकल
मंडळांना परवानगी देण्यासाठी पालिका प्रशासनातर्फे भारंभार शुल्क आकारले जात आहे. मंडपांसाठी पूर्वी 52 रुपये आकारले जात होते. ते आता किमान 750 रुपये अधिक जीएसटी एवढे आकारले जाते. त्याचबरोबर अग्निशमन दलाच्या अर्जाच्या छाननीसाठी अडीचशे रुपये शुल्क आकारले जाते, मात्र ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी मंडळांच्या पदाधिकाऱयांना दादर, वरळी, वडाळा येथील अग्निशमन दलात फेऱया माराव्या लागत आहेत. – रवींद्र कशाळकर, नव महाराष्ट्र उत्कर्ष मंडळ, परळ
परवानग्यांचा पत्ता नाही आणि अधिकारी रजेवर
लालबाग-परळमधील मंडळांना अग्निशमन दलाच्या परवानग्यांसाठी अक्षरशः लटकवले आहे. परवानग्यांसाठी मंडळांचे पदाधिकारी फेऱया घालत असताना परवानगी देणारे अधिकारी मात्र रजेवर गेले आहेत. गणेशोत्सवाला अवघे पाच दिवस उरले असताना परवानगी मिळणार कधी आणि मंडप बांधणार कधी, असा प्रश्न पदाधिकाऱयांपुढे आहे.


























































