
अभय मिरजकर, लातूर
मराठवाड्यातील जेष्ठ संगीततज्ञ पंडित शांतारामजी चिगरी गुरुजी यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठवाड्यातील संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. अंकोली शिवारातील त्यांच्या शेतात सायंकाळी अंत्यविधी करण्यात येणार आहे.
पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांचा जन्म १५ एप्रील १९३९ रोजी कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील खैनूर या गावी झाला होता. वयाच्या सहाव्या वर्षी अंधत्व आल्यामुळे त्यांना दादर येथील अंधशाळेत शिक्षणासाठी पाठवण्यात आले. त्यांनी पं. ओंकारनाथ ठाकूर, पं. नारायणराव व्यास, पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडून ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेतले होते. उस्ताद अहमदजान थिरकवा यांच्या कडून फरुखाबाद घराण्याचे, पंडित बद्रिप्रसाद मिश्र यांच्याकडून बनारस घराण्याचे तर खलिफा नथ्थू खाँ यांच्याकडून दिल्ली घराण्यातील तबला वादनाची तालीम पूर्ण केलेली होती.
१९७१ मध्ये पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांचे लातूरात आगमन झाले होते. १९७३ साली त्यांनी लातूरात सूरताल संगीत विद्यालयाची स्थापना करुन संगीत शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली होती. गायन, तबलावादन, व्हायोलीन, बासरी, मृदंग, सतार इत्यादी वाद्ये वाजवण्यात ते पारंगत होते. अखिल भारतीय गांधर्व मंडळासाठी त्यांनी ६२६४ मिटर जागा संगीताच्या उपक्रमासाठी दान दिली होती.
पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांच्या सांगितीक कार्याच्या गौरवाबद्दल कर्नाटक सरकारने त्यांना २००८ मध्ये कलाश्री पुरस्कार देऊन गौरवले होते. महाराष्ट्र शासनाने राज्य सांस्कृतीक पुरस्कार २०१७ मध्ये दिलेले होता. तर अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्यावतीने नुकतेच त्यांना विशेष सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाबद्दल संगीतक्षेत्रात शोककळा पसरली आहे.
अशी होती कारकिर्द-
लातूर जिल्ह्यातील संगीत क्षेत्रातील मेरुमणी म्हणून ओळख असणारे पं.शांताराम चिगरी गुरुजी यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. आपले संपूर्ण आयुष्यच त्यांनी संगीतक्षेत्रासाठी अर्पण केलेले होते. असा संगीततज्ज्ञ पुन्हा निर्माण होणे नाही अशीच प्रतिक्रिया त्यांच्या निधनामुळे सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
लातूर जिल्ह्यातील संगीत क्षेत्राची ओळखच पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांच्या नावानेच होती. १५ एप्रील १९३९ रोजी कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील खैनूर या छोट्याशा गावात झालेला. त्यांच्या वडिलांचें नाव होते विरगंटीअप्पा तर आईचे नाव होते विरम्मा. या दांपत्यास पाच अपत्ये होती. अठराविश्व दारिद्र्य घरात होते. वयाच्या ८ व्या वर्षी देवीच्या साथीमध्ये शांताराम यांना डोळयाचे अपंगत्व प्राप्त झाले. त्यांच्या जीवनातील प्रकाश संपला. लहानपणापासूनच संगीताचा आवड होती, संगीत एैकण्यासाठी ते आपल्या मित्रांसोबत ग्वालगीरच्या यात्रेत गेले आणि तिथून त्यांच्या आयुष्यातील संघर्षाला सुरुवात झाली. यात्रेत मित्रांची साथ सुटली, एका ट्रकमधून ते विजापूरला दाखल झाले. विजापूरच्या रेल्वेस्थानकावर भीक मागून पोटाची आग शांत केली. पोलीसांनी त्यांना पकडले आणि त्यांची रवानगी मुंबईच्या रिमांड होममध्ये करण्यात आली.
चार दिवस रिमांड होममध्ये ठेवण्यात आले होते त्यांनतर त्यांची रवानगी दादरच्या अंध शाळेत करण्यात आली. त्यांना कन्नड भाषेशिवाय इतर कोणतीच भाषा येत नव्हती. तिथे त्यांनी मराठी, हिंदी भाषा शिकण्यास सुरुवात केली. ब्रेल लिपीच्या माध्यमातून ६ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले सोबतच संगीताचे शिक्षणही घेतले. त्यातच ते अधिक रमले. ग्वाल्हेर घराण्याचे पंडित नारायणराव व्यास यांनी तिथे विद्यार्थ्यांना ग्वाल्हेर गायकी शिकवली, शांताराम यांचा स्वर पक्का होता परंतु ताल कच्चा होता त्यामुळे त्यांना तबला शिकण्याचा सल्ला दिला. बनारस घराण्याचे पंडित बद्रीप्रसाद मिश्रा हे दादरच्या अंधशाळेत शनिवार आणि गुरुवारी तबला शिकवण्यासाठी येत होते. त्यांच्याकडून शांताराम यांनी तबल्याचे शिक्षण घेतले. मुंबई येथे अयोजीत करण्यात आलेल्या तबल्याच्या स्पर्धेत शांताराम चिगरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनतर लखनौ येथे त्यांनी केवळ धाधातिट वाजवून स्पर्धा जिंकली.
त्यानंतर त्यांनी मुंबई सोडली आणि कलकत्ता गाठले, फरुखाबाद घराण्याचे श्रेष्ठ कलावंत उस्ताद अहमदजान थिरकवली यांच्याकडून तबल्याचे शिक्षण घेतले. पुढे दिल्ली घराण्याचे खलिफा उ.नत्थूखाँ यांच्याकडूनही कांही काळ शिक्षण घेतले. गुजरात मधील पं.ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडून पुन्हा ग्वाल्हेर गायकीचे शिक्षण घेतले. पं.विनायकबुवा पटवर्धन, पुणे यांच्याकडून त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या केवळ १४ व्या वर्षी त्यांनी सतारवादक पं.रविशंकर यांच्यासोबत तबला साथसंगत केली. अनेक मान्यवरांसोबत त्यांनी साथसंगत केली.
१९५४ मध्ये त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रात नोकरी केली. प्रारंभी केवळ वाद्ये सुरात लाऊन देण्याचेच काम त्यांना दिलेले होते. बेगम अख्तर, नूरजहाँ यांच्यासोबत त्यांनी साथसंगत केली. आकाशवाणीत नोकरीस असताना त्यांचा मंगेशकर कुटुंबीयांशी जवळचा संबंध आला. त्यांच्यासोबत तबला, ढोलकीची साथसंगतही गुरुजींनी केली. हमदर्द, अलबेला या हिंदी चित्रपटात तसेच साखरपुडा या मराठी चित्रपटात त्यांनी तबला व ढोलकीची साथसंगत केली. त्यानंतर ते आपली जन्मभूमी खैनूरला परतले. ज्ञानदानाची तीव्र इच्छा असल्याने त्यांनी १९७० मध्ये पुन्हा आपले जन्मस्थळ सोडले. उदगीर तालुक्यातील बोळेगाव येथील शकुंतलादेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला, त्याही जन्मजात अंध होत्या. काही दिवस चिगरी दांपत्याने केवळ चुरमुरे खाऊन भागवले. पोट भरण्यासाठी म्हणून त्यांनी तमाशात ढोलकी व हार्मोनियम वाजवण्याचे कामही केले.
सूरताल संगीत विद्यालयाची स्थापना १९७३ मध्ये त्यांनी लातूर येथे केली. केवळ लातूर जिल्ह्यातच नव्हे राज्यभर त्यांचा शिष्यवर्ग निर्माण झालेला आहे.
मराठवाड्याच्या संगीत क्षेत्रातील हा मेरुमणी मात्र सदैव उपेक्षितच राहिला. प्रसिद्धीपासून कायम दुर असणारे पं. शांताराम चिगरी यांना कर्नाटक सरकारने कलाश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. महाराष्ट्र शासनाने राज्य सांस्कृतीक पुरस्कार २०१७ मध्ये दिलेले होता. तर अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्यावतीने नुकतेच त्यांना विशेष सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले होते. अखिल भारतीय गांधर्व मंडळासाठी त्यांनी ६२६४ मीटर जागा संगीताच्या उपक्रमासाठी दान दिली.


































































