गेम्सचा विळखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अतुल कहाते

केरळमधल्या 30 मार्च 2017 रोजी सकाळी 6.59 वाजता ए आशिक नावाच्या विद्यार्थ्यानं आपल्या फेसबुकच्या प्रोफाईल पेजवरचं आपलं छायाचित्र बदललं. त्याच्या जोडीला त्यानं ‘गॉन … विथ … द … विंड’ असा मजकूरही लिहिला. याच मजकुरात त्यानं एक माणूस चालत असल्यासाठीची चित्रं (इमोजी) टाकली. शेवटी त्यानं ‘लवकरच दुसरा शेवट’असं लिहिलं. त्याच्या बारावीच्या वर्षाचा तो शेवटचा दिवस असल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातल्या आयुष्याला रामराम ठोकत असल्याचं आशिकनं लिहिलं असावं अशी त्याच्या मित्रांची समजूत झाली. आशिकच्या या फेसबुक पोस्टवर अनेक जणांच्या प्रतिक्रिया येत राहिल्या. सकाळी 9.16 वाजेपर्यंत आशिक या प्रतिक्रियांना ‘लाईक’ करत राहिला. दुपारी 3.42 वाजेपर्यंत आशिकच्या या पोस्टवर त्याच्या मित्रमंडळीच्या आनंदी आणि मजेशीर प्रतिक्रिया येत राहिल्या. यानंतर काही तासांनी मात्र वातावरण पार बदललं. आशिकच्या या पोस्टवर एकदम रडक्या आणि धक्का बसला असल्यासंबंधीच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. याचं कारण म्हणजे महाविद्यालयातल्या त्या दिवशीच्या निरोप समारंभाला हजेरी लावण्याऐवजी आपल्या झोपण्याच्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आशिकनं जीव दिला होता! पोलिसांना आशिकच्या आत्महत्येचं कारण समजेना. यात काही तरी अतर्क्य आहे असं ते म्हणाले. 2017 सालच्या जुलै महिन्यात मुंबईमध्ये मनप्रीत साहनी नावाच्या विद्यार्थ्यानं उंच इमारतीवरून खाली उडी मारून आत्महत्या केली. यामागचं कारण ‘ब्ल्यू व्हेल चॅलेंज’ असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यानंतर आशिकची आत्महत्यासुद्धा याच कारणामुळे झाली असावी असं पोलीस म्हणायला लागले.

‘ब्ल्यू व्हेल चॅलेंज’ नावाचा एक गेम खेळणाऱया अनेक मुलांनी देशोदेशी आत्महत्या केल्याचं नवंच प्रकरण यातून समोर आलं. हिंदुस्थानातही ठिकठिकाणी मुलं या गेममधल्या आव्हानाची पूर्तता करण्याच्या कारणापोटी आपला जीव गमावून बसली. या सगळ्या मुलांच्या वागण्यामध्ये काही समान गोष्टी आढळल्या. ही मुलं सातत्यानं आपल्या फोनला चिकटलेली असायची. भलत्यासलत्या वेळी ती घराबाहेर पडायची. जवळच्या स्मशानगृहांना ती भेट द्यायची. त्यांच्या शरीरावर जखमा दिसायच्या. उंच इमारतींच्या वरच्या मजल्यावर किंवा गच्चीवर ती उभी राहायची आणि तिथून खाली बघायची. रशियामध्ये 2013 साली या विलक्षण धोकादायक गेमची सुरुवात झाली. सुमारे 50 दिवस ‘ब्ल्यू व्हेल चॅलेंज’ खेळणारे स्वतःला इजा करत राहतात. याचा पुरावा म्हणून संबंधितांना या जखमांची छायाचित्रं अपलोड करावी लागतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे वेड पसरत राहतं. अवेळी झोपेतून उठणं, एखादा भयपट बघणं किंवा ठरावीक प्रकारचं संगीत लावून त्यावर नाचणं अशा कृती सुरुवातीला कराव्या लागतात. हळूहळू आव्हानं घातक व्हायला लागतात. उदाहरणार्थ स्वतःला जखमा करून घेणं, इमारतींवर चढणं असं करत करत शेवटी आत्महत्या करणं असे प्रकार यात असतात. संबंधित मुलानं काटेकोरपणे हे सगळं करावं यासाठी ‘ब्ल्यू व्हेल चॅलेंज’च्या वतीनं एक ‘निरीक्षक’ त्या मुलावर लक्ष ठेवून असतो. त्या मुलाचं ब्रेनवॉशिंग करण्याचं काम हा निरीक्षक करतो. जणू त्या मुलाच्या मेंदूचा ताबा घेणं आणि त्याला आखून दिलेल्या मार्गावरून जाण्यासाठी प्रवृत्त करणं हेच त्याचं काम असतं.

मौजमजा किंवा गंमत करणं हा अगदी सुरुवातीपासून माणसाच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. यासाठीचे सभ्य प्रकार मेजवानी झोडणं, सणसमारंभ साजरे करणं, सहली काढणं, गप्पा ठोकायला एकत्र बसणं असे असंख्य स्वरूपाचे असतात. आधुनिक काळात पाटर्य़ा करणं, दारू पिणं, मुलींचा वापर करणं, अमली पदार्थांचं सेवन करणं अशा गोष्टींची त्यात भर पडत चालली आहे आणि सभ्य-असभ्य यांच्यामधली दरीही धूसर झाली आहे. ‘आत्ताचा हा क्षण मी पुरेपूर उपभोगणार’ ही यामागची मुख्य संकल्पना आहे. शांतपणे विचार करणं किंवा कुठलाही विचार मनात येऊ न देता काहीच न करणं या संकल्पनांच्याही अगदी विरुद्ध आहे. आता सातत्यानं आनंद उपभोगत राहण्याच्या धुंदीचा अनुभव देणाऱया गोष्टींमध्ये ‘गेम्स’ची भर पडली आहे. गेम्स खेळणाऱया लोकांचं सरासरी वय 30 वर्षांचं आहे आणि गेम्स खेळणाऱयांपैकी 45 टक्के महिला आहेत!

मुळात माणूस गेम का खेळतो? अर्थातच बसल्या जागी कंटाळा घालवण्यासाठी गेम खेळणं हा सोपा मार्ग आहे यात शंकाच नाही, पण निकोल लाझारो नावाच्या माणसाचं या संदर्भातलं मत विचारात घेण्यासारखं आहे. याचं कारण म्हणजे गेम तयार करताना गेम खेळणाऱया लोकांची मानसिकता कशी असते याविषयीचा अभ्यास करून त्यासाठी अनेक क्लृप्त्या सुचवणाऱया जगातल्या पहिल्या कंपनीचा तो संस्थापक आहे. लाझारोच्या म्हणण्यानुसार खूप लोकप्रिय गेम्समध्ये एकंदर 4 महत्त्वाच्या घटकांपैकी किमान 3 घटक असणं आवश्यक असतं. यामधला पहिला घटक ‘कठीण आव्हानं’ हा असतो. ही आव्हानं पार करणं गेम खेळणाऱयांना गेममध्ये खिळवून ठेवतं; तसंच गेम खेळत राहून आपण ही आव्हानं पार करण्याइतके सक्षम बनू असं ही गेमसंबंधित माणसाला सुचवत असते. दुसरा घटक ‘साध्या गमतींचा’ असतो. यात गेम खेळण्यातून मिळणारा आनंद पुरेसा असतो. तिसरा घटक ‘गंभीर प्रकारच्या गमतींचा’ असतो. यातून अगदी साध्या गोष्टी रंजक बनवल्या जातात. चौथा आणि शेवटचा घटक ‘लोकांशी जोडलं जाण्याचा’ असतो. म्हणजेच इतरांबरोबर गेम खेळणं, त्यात झुंजणं, मात करण्यासाठी धडपडणं अशा गोष्टी असतात.

आपल्या नेहमीच्या आयुष्यात या चार घटकांपैकी जास्तीत जास्त एक किंवा दोन घटक आपण अनुभवत असतो. गेम्स लिहिणारे मात्र हे 3-4 घटक आपल्या गेम्समध्ये खुबीनं पेरतात. याखेरीज गेम तयार करणारे लोक माणसाला सातत्यानं आपल्याकडे खेचून घेण्यासाठीच्या सोयी करतात. म्हणजेच गेममध्ये अनेक काठीण्य पातळ्या असतात. प्रत्येक पातळी आधीपेक्षा जास्त अवघड असते. असं सातत्यानं सुरू राहिल्यामुळे काठीण्य पातळी ओलांडून पुढे जात राहण्याचं आव्हान गेम खेळणाऱयाच्या मनात कायम राहतं. तसंच ठरावीक काळानंतर म्हणजेच सध्याची पातळी ओलांडल्यानंतर गेमकडून बक्षीस मिळत असल्यामुळे गेम खेळणारा त्यात गुंतून राहतो. प्रयोगशाळांमध्ये उंदरांना ठरावीक क्रियांनंतर अन्न किंवा विजेचे झटके देण्याचे प्रयोग अनेकदा केले जातात. गेम खेळणाऱया माणसाची अवस्था अक्षरशः अशा उंदरांसारखी असते.

गेम खेळणं हा निव्वळ विरंगुळा राहिलेला नसून त्यामुळे काय घडू शकतं हे समजून घेणं आणि हा प्रकार हाताबाहेर जाऊ नये यासाठीची काळजी किमान आपल्या कुटुंबापुरती आणि आपल्या परिचयातल्या लोकांच्या बाबतीत घेणं हे किती गरजेचं झालं आहे हे यातून समजलं असेल अशी आशा आहे!

– [email protected]