
सामना ऑनलाईन, सवार
हिंदुस्थानच्या खेळाडूंनी 19 वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत संयुक्त अरब अमिराती (यूएई) संघाची 227 धावांनी धुळधाण उडवत त्यांना क्रिकेटचे चांगलेच धडे शिकविले. अनुज रावत (102) व देवदत्त पडीक्कल (121) या सलामीवीरांची दणकेबाज शतके आणि त्यानंतर डावखुरा फिरकीपटू सिद्धार्थ देसाईने टिपलेले 6 बळी ही हिंदुस्थानच्या रुबाबदार विजयाची प्रमुख वैशिष्टय़े ठरली.
हिंदुस्थानकडून मिळालेल्या 355 धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईचा डाव 33.5 षटकांत केवळ 127 धावांत गारद झाला. त्यांच्याकडून अली मिर्झा (41), फिजी जॉन (24) व कर्णधार फहाद नवाज (22) यांनीच काय तो हिंदुस्थानी गोलंदाजीचा थोडाफार प्रतिकार केला. यूएईच्या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.
त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानी संघाने 6 बाद 354 धावसंख्या उभारली. अनुज रावत व देवदत्त पडीक्कल यांनी 34.5 षटकांत 205 धावांची सलामी देत हिंदुस्थानला खणखणीत सुरुवात करून दिली.
summary- india beat uae in asia cup under 19




























































