मालवण शहरात भरदिवसा घरफोडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण शहरात भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे दांडी परिसरात एकच खळबळ उडाली. दांडी शाळेनजीक राहणार्‍या दीपक हडकर यांच्या बंद घराची पाठीमागून कौले काढत आत घुसून कपाटातील सोन्याचे दागिने, कपडे तसेच रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना बुधवार सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

दरम्यान पोलिसांनी एका संशयित इसमास ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले.

दांडी शाळानजीक राहणारे दीपक हडकर हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. सकाळी ते व कुटुंबातील अन्य सदस्य कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. याच संधीचा फायदा उठवीत संशयित चोरट्याने घराची कौले काढून आत प्रवेश केला. आतील कपाट फोडून आतील सोन्याची माळ, अंगठ्या, चांदीचे साहित्य तसेच रोख साडे सात हजार रुपये असा ऐवज लांबविला. घरातील कपडेलत्ते इतरत्र टाकून दिले. शिवाय घरात घाणही करून ठेवली. दुपारी साडे बारा वाजण्याच्या दरम्यान शेजारच्या लोकांनी हडकर यांना तुमच्या घरात चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानुसार हडकर हे घरी आले असता त्यांना दागिने, कपडे, रोख रक्कम चोरीस गेल्याचे दिसून आले.

या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, संतोष गलोले, अमोल महाडिक यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. संशयित चोरटा हा स्थानिकच असण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ शोध मोहिम राबवीत शहरातील बंदर जेटी येथून एका संशयितास ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी चौकशी तसेच गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. अधिक तपास पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील पवार हे करत आहेत.