
सामना प्रतिनिधी । पणजी
भाजपने दोन आमदार फोडल्या नंतर हादरलेल्या काँग्रेसने जोरदार टिका करताना येऊ घेतलेल्या निवडणुकीत जनताच सत्ताधारी पक्ष आणि काँग्रेस सोडून गेलेल्या आमदारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. सत्तेसाठी हपापलेल्या भाजपने मागील दारातून प्रवेश करून सरकार स्थापन केले. आताही राज्यातील सरकारी यंत्रणा तसेच केंद्रातील यंत्रणेचा गैरवापर केला आहे. सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांनी प्रचंड दबावाखालीच आमदारकी सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असावा, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी व्यक्त केली. काँग्रेस विधीमंडळ गटाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या बैठकीला काँग्रेसचे 14 आमदार हजर होते.
गोव्यात भाजपची फोडाफोडी, काँग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा
येत्या 6 महिन्यांत हे सरकार कोसळणार आणि काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणार असा विश्वास आमदार रवी नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. बाबू कवळेकर हेच आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील, असे नाईक व आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले. मतदारांनी दिलेला कौल भाजप उघडपणे झिडकारत आहे. राज्यपाल कार्यालयाचा भाजपकडून गैरवापर सुरू आहे, असा आरोप आमदार लुईझिन फालेरो यांनी केला. सोपटे व शिरोडकर यांच्या विरोधात काँग्रेस सक्षम उमेदवार उभे करून त्यांचा पराभव करेल, असा दावा आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केला. आमदार प्रतापसिंह राणे यांनी भाजपची कृती अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले.
माजी मुख्यमंत्री पार्सेकर नाराज
दरम्यान माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपल्या विरोधात निवडून आलेल्या सोपटे यांना भाजपमध्ये प्रवेश देताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्या बद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. फुटिरांना धडा शिकवून लोकांनी राजकारण स्वच्छ व शुद्ध करावे, अशी तिखट प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी व्यक्त केली आहे.
गोव्यात ‘हाता’च्या बोटांवर मोजण्याइतकेच काँग्रेस आमदार राहणार?
दरम्यान, मांद्रे मतदार संघातील संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी सायंकाळी सोपटे यांचा पुतळा जाळून आपली नाराजी व्यक्त केली.




























































