येत्या निवडणुकीत भाजपचा सत्तेचा माज उतरवा – खासदार अशोक चव्हाण                                 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। वसमत 

सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आणि राज्य सरकारच्या विरोधात रणशिंग फूंकून महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली जनसंघर्ष यात्रा शनिवारी 27 ऑक्टोबर रोजी वसमत येथे दाखल झाली. त्यानिमित्ताने जिल्हा परिषद मैदानात जाहिरसभा घेण्यात आली.

वसमत शहरात ठिकठिकाणी जनसंघर्ष यात्रेच्या स्वागतासाठी स्वागत कमानी, फलक लावले होते. यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी सरकारचा कारभारावर ताशेरे ओढले. राज्य सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यात प्रामुख्याने शेतकरी, युवक, शेतमजुर, महिला, सर्वसामान्य नागरिक यांच्या बाबतीत चुकीचे निर्णय घेतले आहेत. तसेच वाढलेली महागाई, दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारकडुन सुरू असलेली चालढकल, याविरुध्द आवाज उठवण्यासाठी ही संघर्षयात्रा काढली आहे. मोदी सरकारमध्ये सीबीआयसारख्या संस्था उद्धवस्त होताहेत, तर अच्छे दिनाचे गाजर दाखवत सारख्या तारखा देत आहेत. राम मंदिर बांधण्यासाठी सुद्धा तारीख पे तारीख देत आहेत, अशा थापा मारणार्‍यांना येत्या निवडणुकीत खाली खेचुन त्यांची जागा त्यांना दाखवा तसेच हे सरकार अंबानी – अदानीचे आहे. त्यांना पैशाच व सत्तेचा माज आला आहे. त्यांचा माज उतरवा असा टोला खासदार अशोक चव्हाण यांनी लगावत सरकारचे वाभाडे काढले.

या सभेसाठी गुजरात राज्याचे प्रभारी खासदार राजीव सातव, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, अमर खानापुरे, तुकाराम रेंगे, आमदार डॉ. संतोष टारफे, आमदार डी.पी. सावंत, आमदार अमर राजुरकर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.