केळीचे बाजारभाव डझना मागे १० रूपयांनी वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

भाऊबीज सणा निमित्ताने राहुरीत केळीचा डझनाचा भाव ३५ ते ४० रूपये झाला आहे. श्रावण व आषाढ महिन्याच्या तुलनेत आजचे केळीचे बाजारभाव डझना मागे १० रूपयांनी वाढले आहेत.

खान्देश, धुळे, रावेर, जामनेर, शिरपूर तर नगर जिल्ह्यातील भेंडा, शेवगाव, कुकाणा, देडगाव, खुपटी येथील केळीला राहुरी तालुक्यात पुर्वी पासुनच विशेष मागणी आहे. दरम्यान, पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने खानदेश बरोबरच नगर जिल्ह्यातील केळीचे उत्पादन यंदा घटले आहे. केळीचे कमी उत्पादन बाजारभाव वाढीस कारणीभूत ठरले आहे.

श्रावण व आषाढ महिन्यात खानदेश येथील १ नंबर कच्च्या केळीचा १ किलोचा बाजारभाव १० ते ११ रूपया पर्यंत जावुन पोहचला होता. आज कच्ची केळीचा खानदेश येथील जागेवरचा खरेदीदर १२ ते १३ रूपये किलो झाला आहे. वाहतुक तसेच उतराई मजुरीचा २ रूपये खर्च पाहता ठोक खरेदीदार व्यापाऱ्यांना १ नंबर कच्ची केळी १५ रूपये किलो बाजारभावाने मिळत आहे.

भाऊबीज सण असल्याने खानदेश मधील कच्च्या केळीची आठवडे भरापुर्वी २५ टन आवक झाली होती. तर नेवासा भागातील पानेगाव, खुपटी, कुकाणा येथील २ टन कच्ची केळीची राहुरीच्या बाजारात आवक सुरू आहे.२ दशकापुर्वी धुराच्या भट्टीत केळी पिकविण्याची वातानुकूलित यंञनेत कच्ची केळी पिकवुन छोट्या व्यावसायीकांना या केळीची विक्री केली जात असे. आज ठोक केळी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडुन केळी पिकविण्यासाठी रायपिंग चेंबरचा वापर केला जात आहे.

श्रावण व आषाढ महिन्यात राहुरीत पिकलेल्या केळीचा बाजारभाव २० ते २५ रूपये डझन होता. आज खानदेश येथील कच्च्या केळीचा बाजारभाव वाढल्याने १ डझन दर्जेदार केळीची ३५ ते ४० रूपये डझन या भावाने विक्री सुरू आहे. राहुरी शहरात १५ टन तर तालुक्यातील ९५ गावात ७ टन केळीची दैनंदिन विक्री केली जात आहे.

यावर्षी पाऊस नसल्याने पाणी टंचाई निर्माण होऊन खानदेश तसेच नेवासा भागात केळीची लागवड घटली आहे. लागवडी नंतर १२ महिन्याने हाती येणारे शाश्वत पिक असलेली केळीची लागवड कमी असल्याने पुढील वर्षी केळीचा बाजारभाव आजच्या पेक्षा उच्चांकी राहण्याची दाट शक्यता आहे.

केळीची लागवड झाल्यानंतर शेणखताची मात्रा देऊन पिक घेणे ही पारंपारिक पद्धत रासायनीक खतामुळे मागे पडली आहे. शेणखताच्या मात्राने तयार झालेले केळीचे पिक दर्जेदार तसेच विशेष गोडी असल्याचा तर रासायनीक खताच्या मात्रात तयार झाल्याने केळीची गोडी कमी झाल्याचा अनुभव उत्पादक शेतकऱ्यांचा आहे.

धुराची भट्टीत केळी पिकविण्याच्या पारंपारिक पध्दतीला ग्राहकांच्या दृष्टीने विशेष महत्व होते. २ दशकापासुन ही पध्दत बंद होऊन कारपेट मध्ये केळी पिकविणे सुरू झाले. माञ फळे पिकविण्यासाठी कारपेटचा वापरावर बंदी घालण्यात आल्याने विथ्रेल केमिकलचा वापर करण्यात आला. दरम्यान, विथ्रेल मध्ये फळे पिकविल्यास शरीरातील पांढऱ्या पेशी वाढत असल्याचा वैद्यकीय क्षेत्रात निष्कर्ष काढण्यात आल्याने फळे पिकविण्यासाठी रायपिंग चेंबरची नवीन पध्दत गेल्या ५ वर्षापासून सुरू करण्यात आली आहे.