
सामना ऑनलाईन, चंदिगड
पंजाबमध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’चे चार दहशतवादी घुसले असून जम्मू-पठाणकोट महामार्गावरून त्यांनी इनोव्हा कार पळविली आहे. 2016 प्रमाणे हल्ला करण्याचा कट पाकिस्तानने रचल्याची शक्यता आहे. पंजाब, दिल्ली, जम्मू-कश्मीरमध्ये हाय अॅलर्ट जारी केला आहे. सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
2016मध्ये पठाणकोट एअरबेसवर हल्ला करण्यापूर्वी ‘जैश’च्या दहशतवाद्यांनीही अशीच मोडस ऑपरेंडी वापरली होती. आताही चार दहशतवाद्यांनी जम्मूहून पंजाबच्या पठाणकोटला जाण्यासाठी सिल्व्हर रंगाची इनोव्हा कार बुक केली. माधोपूर परिसरात येताच बंदुकीचा धाक दाखवून कारचालकाला रस्त्यावर फेकले आणि कार घेऊन दहशतवादी फरारी झाले. कारचालकाने पोलीस ठाण्यात जाऊन खबर दिली. दहशतवादी कार घेऊन जम्मूहून पठाणकोटच्या दिशेने पळाल्याची खबर मिळताच सुरक्षा यंत्रणांनी पंजाब, दिल्लीसह जम्मू-कश्मीरात हाय अॅलर्ट जारी केला आहे. सीसीटीव्ही तपासले जात असून महामार्गावर वॉच ठेवला आहे. माधोपूर परिसरात दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.




























































