
योगेश पाटील । हिंगोली
शहरातील बावनखोली भागामध्ये सात वर्षीय मुलगी घरी एकटीच असल्याची संधी साधत 45 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर शहर पोलीस ठाण्यासमोर आरोपीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरीकांचा मोठा जमाव जमला होता. संतप्त जमावाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक करुन रोष व्यक्त केला.
याबाबत पोलिसांनी दिेलल्या माहितीनुसार, बावणखोली भागातील सात वर्षीय बालिकेची आई त्यांचे नातेवाईक उपचारासाठी दाखल असल्यामुळे औरंगाबाद येथे भेटीला गेली होती. 25 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास याच भागातील मधुकर निवृत्ती वाठोरे (45) हा इसम बालिकेच्या घरी आला व तिला पैशाचे आमिष दाखवून स्वतःच्या घरी नेऊन छतावर अत्याचार केला. याबाबत वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी आरोपीने दिली
दरम्यान, आई परत आल्यावर मुलीने ही घटना सांगितली. यानंतर पालकांनी मुलीसह हिंगोली शहर पोलीस ठाणे गाठत पोलिसात तक्रार दिली. शहर पोलीस ठाण्याच्या आवारात नागरीकांचा मोठा जमाव जमला होता. अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी शहर पोलीस ठाण्यात येऊन स्वतःच्या देखरेखीमध्ये तक्रार नोंदवून घेतली. मधुकर वाठोरे याच्याविरुध्द बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमासह बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती डीवायएसपी राहुल मदने यांनी दिली. तब्बल तीन तास पोलिसांनी याप्रकरणाचा गुन्हा नोंदविण्यासाठी दिरंगाई केल्याने पोलीस स्टेशन परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास संतप्त जमावाने विद्यार्थ्यांना सेनगाव येथे सोडून हिंगोलीला परत येत असतांना बावनखोली भागाच्या समोरील रस्त्यावर एमएच 06 एस 8559 या क्रमांकाच्या बसवर दगड फेक केली. याप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.

































































