
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
नोटाबंदी हा महाभयंकर राक्षसी धक्का होता. नोटाबंदीमुळे देशाचा आर्थिक विकास मंदावला अशा शब्दांत माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
नोटाबंदी वेळी अरविंद सुब्रमण्यम हे मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. सहा महिन्यांपूर्वी सुब्रमण्यम यांनी राजीनामा दिला आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटाच चलनातून बाद करून नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. सुब्रमण्यम यांनी पहिल्यांदाच नोटाबंदीच्या निर्णयावर मौन सोडले आहे.
‘द टू पझल्स ऑफ डिमोनेटायझेशन-पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक’ या पुस्तकात त्यांनी स्पष्ट मते मांडली आहेत. या पुस्तकात ‘चॅलेंजेस ऑफ दी मोदी-जेटली इकॉनॉमी’ हा स्वतंत्र चॅप्टर आहे.
काय म्हणाले सुब्रमण्यम…
नोटाबंदी जाहीर करण्यापूर्वी देशाचा विकासदर 8 टक्के होता. पण नोटाबंदीनंतरच्या तिमाहीत विकासदर 6.8 टक्क्यांपर्यंत खाली घसरला.
जगाच्या आधुनिक इतिहासाकडे पाहिले तर कोणत्याही देशाने सहजासहजी नोटाबंदीचा निर्णय घेतलेला नाही. युद्धासारखी परिस्थिती किंवा राजकीय अराजकता माजली तेव्हा काही देशांनी नोटाबंदी केलेली दिसते.



























































