फळबाग योजना दुष्काळाच्या दुष्टचक्रात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कळवण

शासनाने या वर्षी सुरू केलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेला दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडल्याचे दिसून येत आहे. कळवण उपविभागात 573. 76 हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी लक्षांक असताना मागील आठवड्याअखेर उपविभागात फक्त 41.9 हेक्टर लागवड साध्य झाली असल्याने या योजनेला ग्रहण लागल्याचे पहावयास मिळते.

उपविभागातील कळवण, देवळा, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांतील 669शेतकऱयांची या योजनेमध्ये निवड झाली होती. त्यात 216 शेतकऱयांना पूर्वसंमती मिळाली असून कृषी विभागाच्या वतीने शेतकऱयांना वेळोवेळी मार्गदर्शन करून फळबाग लागवड योजनेला प्रतिसाद मिळत आहे. पाण्याअभावी संमती मिळालेले शेतकरी झाडे लावून ती कशी जागवावीत या संभ्रमात अडकली असून या वर्षीही शेतकऱयांचे बागायतदार बनण्याचे स्वप्न भंगणार आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे पारंपरिक पिकातून शेतकऱयांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. शेतकऱयांना बागायतदार बनविण्यासाठी शासनाने फळबाग लागवड योजना सुरू केली, मात्र योजना सुरू झाली आणि यंदा भीषण दुष्काळ पडला आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाभ घेऊ न शकणाऱया शेतकऱयांना या योजनेसह लाभ घेता येणार आहे. या योजनेत वेगवेगळ्या फळ पिकांचा समावेश आहे. पुढील काळासाठी जनावरांसाठी पाणी मिळेल का नाही याची शास्वती नसल्याने फळ झाडे कशी जगवायची हाच प्रश्न पडला आहे.

अशी आहे योजना – ठिबक सिंचन अनिवार्य असलेल्या योजनेमध्ये लाभार्थी शेतकऱयांना पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱया वर्षी 20 टक्के, तिसऱया वर्षी 20 टक्के अनुदान मिळणार आहे. साहजिकच दुसऱया व तिसऱया वर्षाच्या अनुदान मिळविण्यासाठी ती झाडे जगविणे गरजेचे आहे. बागायती झाडे 90 टक्के तर कोरडवाहू 80 टक्के जिवंत ठेवण्याची विशेष अट योजनेत आहे.

या योजनेमध्ये ठिबक सिंचन अनिवार्य असल्यामुळे योजना महत्त्वाची आहे. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन प्रभावित होणार असल्यामुळे शेतकऱयांचा प्रतिसाद कमी आहे. – दिलीप देवरे – उपविभागीय कृषी अधिकारी – उपविभाग कळवण

चांगल्या प्रतीचा डाळिंब बाग तयार करण्याची इच्छा आहे . त्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची पूर्वसंमती मिळाली असली तरी सद्या जेमतेम दीड ते दोन महिने पुरेल एवढेच पाणी उपलब्ध आहे तरीही उन्हाळ्यासाठी पाण्याच्या नियोजनाचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. -आनंदा पाटील – पूर्व संतदार शेतकरी