
स्वस्त धान्य दुकानाला वेळेची मर्यादा असल्याने आता पुरवठा खात्याकडून 24 तास धान्य मिळण्यासाठी नाशिकमध्ये राज्यातील पहिले अत्याधुनिक ‘अन्नपूर्ती धान्य एटीएम’ सुरू करण्यात आले आहे. अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शनिवारी या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
स्वस्त धान्य दुकाने ही ठराविक वेळेत सुरू असतात, त्याच वेळेत पात्र लाभार्थ्यांना येथून धान्य घेता येते. ही सेवा 24 तास उपलब्ध व्हावी, यासाठी शनिवारी नाशिकरोडच्या गोरेवाडी येथे अन्नपूर्ती धान्य एटीएम उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कामानिमित्त निर्धारित वेळेत स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेणे शक्य नसणाऱया लाभार्थ्यांना या सुविधेचा चोवीस तास लाभ घेता येणार आहे. अन्नधान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे होणार आहे.
नाशिक जिह्यात 39 लाख लाभार्थ्यांना 2608 दुकानांमधून धान्य मिळते. हळुहळू सर्वत्र हे मशीन आणण्यात येतील. पात्र लाभार्थ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने हक्काचे धान्य सन्मानाने आणि वेळेत मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे मंत्री भुजबळ यावेळी म्हणाले. या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपायुक्त प्रशांत काळे, जिल्हा धान्य वितरण अधिकारी रमेश गायकवाड आदी हजर होते.
35 सेकंदात 25 किलो धान्य
या धान्य एटीएम मशीनसमोरील निश्चित ठिकाणी रेशनकार्ड ठेवा. ई-पॉस यंत्रात रेशनकार्ड क्रमांक टाका आणि ‘पडताळणी’ करा. त्यानंतर आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणिकरण करा. स्क्रिनवर उपलब्ध रेशन व प्रमाणाची खात्री करून घ्या. आपल्याकडील पिशवी किंवा भांडे धान्य बाहेर येण्याच्या जागी ठेवा. ‘वितरण सुरू करा’ हे बटण दाबा, त्यानंतर 35 सेकंदात तुम्हाला 25 किलो धान्य मिळेल.






























































