प्रेरणा – गणिताच्या विश्वात अकोल्याचा झेंडा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मेधा पालकर

palkarmedha03.gmail.com

विज्ञानाची खरी प्रगती ही केवळ तात्कालिक उपयोगाच्या मोजपट्टीवर मोजता येत नाही. याचीच प्रचीती अकोल्याचे सुपुत्र प्रा. महेश काकडे यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील गणितीय संशोधनाने दिली आहे. त्यांना प्रतिष्ठेचा ‘रामानुजन युवा गणितज्ञ पारितोषिक’ जाहीर होणे हा महाराष्ट्रासाठी आणि भारतीय संशोधनविश्वासाठी अभिमानाचा क्षण आहे.

भारतीय बुद्धिमत्तेचा जागतिक गौरव शुद्ध गणिताचा अभ्यास म्हणजे केवळ आकडय़ांचा खेळ नव्हे, तर विश्वाच्या रचनेचा वेध घेण्याचा प्रयत्न! अशा मूलभूत संशोधनाकडे समाजात अनेकदा दुर्लक्ष होते. त्यातून तत्काळ आर्थिक लाभ मिळत नाही, उद्योगधंद्यांना लगेच उपयोग होत नाही, असा युक्तिवाद केला जातो, मात्र विज्ञानाची खरी प्रगती ही केवळ तात्कालिक उपयोगाच्या मोजपट्टीवर मोजता येत नाही. याचीच प्रचीती अकोल्याचे सुपुत्र प्रा. महेश काकडे यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील गणितीय संशोधनाने दिली आहे. त्यांना प्रतिष्ठेचा ‘रामानुजन युवा गणितज्ञ पारितोषिक’ जाहीर होणे हा महाराष्ट्रासाठी आणि भारतीय संशोधनविश्वासाठी अभिमानाचा क्षण आहे.

भारत सरकार, इटलीतील ट्रिएस्टे येथील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर थिओरेटिकल फिजिक्स’ आणि ‘इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल युनियन‘ यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप 10 हजार अमेरिकी डॉलर असे आहे. 2005 पासून विकसनशील देशांतील तरुण गणितज्ञांच्या मूलभूत संशोधनाचा गौरव करणाऱ्या या पुरस्काराने यंदा महेश काकडे यांच्या कार्याची दखल घेतली आहे.

अकोल्यापासून केंब्रिजपर्यंत…

?महेश काकडे यांचा प्रवास नव्या पिढीला दिशा देणारा आहे. अकोल्यात जन्मलेल्या काकडे यांनी बंगळुरूच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स‘ या प्रतिष्ठित संस्थेत उच्चशिक्षण घेतले. त्यानंतर ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शुद्ध गणिताच्या क्षेत्रात संशोधन केले. ब्रिटनमध्ये काही काळ अध्यापन केल्यानंतर ते पुन्हा भारतात परतले आणि बंगळुरूतील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये अध्यापन व संशोधन करू लागले.

अंकांच्या पलीकडचे गणित!

प्रा. काकडे यांचे प्रमुख संशोधनक्षेत्र म्हणजे ‘नंबर थिअरी’ अर्थात अंकसिद्धांत. पूर्णांकांचे गुणधर्म, त्यांच्यातील संबंध आणि गणितीय रचनांमधील खोलवर दडलेले नियम यांचा या शाखेत अभ्यास केला जातो. वरकरणी साध्या वाटणाऱ्या संख्यांमागे किती गुंतागुंतीचे गणित दडलेले असते, याचा शोध घेणे हे या संशोधनाचे वैशिष्ट्य आहे.

काकडे यांच्या संशोधनाची विशेष दखल ‘इवासावा अनुमान’ आणि त्यासंबंधित अविनिमय इवासावा सिद्धांताच्या क्षेत्रात घेतली गेली आहे. गणितातील अत्यंत गुंतागुंतीच्या बीजगणितीय आणि अंकगणितीय रचनांचा अभ्यास करताना या सिद्धांतांना महत्त्व प्राप्त होते. या विषयातील संशोधन समजून घेण्यासाठी रेषीय बीजगणित, गाल्वा सिद्धांत आणि बीजगणितीय संख्या सिद्धांत यांसारख्या शाखांची पार्श्वभूमी आवश्यक असते.

भारतीय गणिताच्या इतिहासात श्रीनिवास रामानुजन यांचे नाव अढळ आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत त्यांनी जागतिक गणितविश्वावर आपली अमिट छाप उमटवली. त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा केवळ सन्मान नसून, मूलभूत संशोधनातील जिज्ञासा, कल्पकता आणि चिकाटी यांचा गौरव आहे. या पुरस्काराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गणिताची गोडी तरुणांमध्ये निर्माण करण्यासाठी काकडे करीत असलेले प्रयत्न. दहावीच्या आधीच केवळ कुतूहलापोटी त्यांनी ‘एलिमेंटरी नंबर थिअरी’ हे पुस्तक वाचले होते. एखाद्या विषयात मनापासून रस निर्माण झाला तर कठीण वाटणाऱ्या संकल्पनाही समजून घेता येतात, याचा अनुभव त्यांनी घेतला.

आज ते ‘युट्यूब’सारख्या माध्यमांचा वापर करून अंकसिद्धांतातील मूलभूत कल्पना, डायोफँटाइन समीकरणे आणि गणितातील अन्य संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. संशोधन स्वतपुरते मर्यादित न ठेवता त्यातून निर्माण झालेले ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीदेखील महत्त्वाची जबाबदारी आहे. काकडे यांच्या या प्रयत्नांचे विशेष कौतुक व्हायला हवे.

गौरव एका गणितज्ञाचा, प्रेरणा हजारोंना!

महेश काकडे यांना मिळालेला हा सन्मान महाराष्ट्रातील ग्रामीण आणि निमशहरी भागांतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रेरणादायी आहे. मात्र अशा यशाचा केवळ गौरव करून थांबणे पुरेसे नाही. देशात संशोधनासाठी अधिक सुविधा, विद्यापीठांमध्ये दर्जेदार मार्गदर्शन, मूलभूत विज्ञानासाठी भरीव निधी आणि तरुण संशोधकांना प्रोत्साहन देणारी व्यवस्था उभी राहणे गरजेचे आहे.

अकोल्याच्या मातीतून उगवलेली प्रतिभा आज जागतिक गणितविश्वात मान्यता मिळवत आहे. हा महाराष्ट्राचा अभिमान आहे. गणिताच्या गुंतागुंतीच्या विश्वात नवे मार्ग शोधणाऱ्या महेश काकडे यांचे यश तरुण पिढीला एकच संदेश देते-जिज्ञासेला सीमारेषा नसतात आणि ज्ञानाच्या शोधाला भौगोलिक मर्यादा नसतात!