आरोग्य – रक्तदाब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. आशुतोष कुलकर्णी  

रक्तदाब म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांमधून (धमन्यांमधून) रक्त वाहत असताना ते रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जो दाब (प्रेशर) निर्माण करते, त्याला रक्तदाब म्हणतात.

उदाहरण द्यायचे झाले तर आपले शरीर ही रक्ताने भरलेली बरणी आहे असे समजा. बरणीच्या आतल्या भिंतीवर दाब किती असेल हे मोजण्याचे काम रक्तदाब मोजणारे यंत्र करते. जर बरणीचा आकार हळूहळू आकुंचित व्हायला लागला तर दाब वाढेल किंवा बरणीत अजून पाणी भरायला सुरुवात केली तरी दाब वाढेल.

हीच परिस्थिती आपल्या शरीराच्या बाबतीत होते. रक्तवाहिन्या वयानुसार कठीण होऊ लागल्या, त्यात काही कारणाने भिंतीवर आतून चरबी साठू लागली तर रक्ताचा दाब वाढू लागतो अशी अनेक कारणे आहेत.

कोणत्याही एका स्पष्ट वैद्यकीय कारणाशिवाय अनेक वर्षांच्या कालावधीत रक्तदाब हळूहळू वाढायला लागतो. जीवनशैली आणि अनुवांशिक घटकांच्या एकत्रित परिणामांमुळे हे होऊ शकते. त्यात अयोग्य आहार ज्यात सोडियमचे (मीठ) प्रमाण जास्त आणि पोटॅशियमचे प्रमाण खूप कमी असणे.

बैठी जीवनशैली किंवा व्यायामाचा अभाव यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे हृदयाला प्रत्येक आकुंचनासोबत जास्त काम करावे लागते. शरीराचे वजन जास्त असल्यामुळे रक्तवाहिन्यांमधून फिरणाऱ्या रक्ताचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रक्ताचा दाब वाढतो. दीर्घकाळ राहणाऱ्या मानसिक ताणामुळे रक्तदाब अचानक वाढतो. धूम्रपान आणि तंबाखू खाण्यामुळे रक्तदाब ताबडतोब वाढतो, तर तंबाखूमधील रसायने रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तराला इजा पोहोचवतात. जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्याने काळानुरूप हृदयाला हानी पोहोचते.

कुटुंबामध्ये उच्च रक्तदाबाचा इतिहास असल्यास हा धोका वाढतो, तसेच जसजसे वय वाढते तसतशा रक्तवाहिन्या नैसर्गिकरित्या कडक होत जातात. काही वेळेस उच्च रक्तदाब अचानक उद्भवतो त्याचे कारण अंतर्गत वैद्यकीय आजार किंवा विशिष्ट औषधे असू शकतात. त्यात महत्त्वाचे किडनीचे (मूत्रपिंड) आजार, अंतस्रावी ग्रंथींचे विकार उदा अॅड्रिनल ग्रंथींचे टय़ूमर, कुशिंग सिंड्रोम, थायरॉईडच्या समस्या किंवा प्रायमरी अल्डोस्टेरोनिझम यांसारख्या परिस्थिती कारण ठरू शकते.

तसेच रात्री घोरणे म्हणजे ‘ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अप्निया’मुळे झोपेत असताना रक्तातील ऑक्सिजनची पातळी वारंवार खालावते, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांवर ताण पडतो.

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणारी वेदनाशामक औषधे (उदा. आयबुप्रोफेन आणि नॅप्रॉक्सिन), गर्भनिरोधक गोळ्या, सर्दीवरील औषधे (डिकंजेस्टंट्स) आणि काही विशिष्ट औषधे. याशिवाय कोकेन आणि अॅम्फेटामाइन्स यांसारख्या अमली पदार्थांमुळे रक्तदाब अत्यंत वेगाने वाढतो.

जन्मापासूनच रक्तवाहिन्यांमध्ये असणारे रचनात्मक दोष, जसे की मुख्य रक्तवाहिनी अरुंद असणे हेही काही प्रमाणात आढळते.

उच्च रक्तदाबामुळे होणारे पक्षाघात किंवा हृदयविकाराचा झटका यांसारखे गंभीर धोके टाळण्यासाठी रोजच्या जीवनशैलीतील बदल आणि वैद्यकीय उपचार (औषधे) या दोन्हीची डायेटरी अप्रोचेस टू स्टॉप हायपरटेंशन (DASH) आहारावर लक्ष केंद्रित करा. यामध्ये फळे, भाज्या, तृणधान्ये, कोंबडीचे मांस (पोल्ट्री), मासे आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असतो.

मिठाचे प्रमाण अत्यंत कमी करा. प्रक्रिया केलेले मांस (प्रॉसेस्ड मीट), कॅनमधील सूप आणि गोठवलेले (फ्रोझन) अन्न खाणे टाळा. केळी, पालक आणि रताळे यांसारखे पोटॅशियमयुक्त पदार्थ खा, जे नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी करण्यास मदत करतात (तुम्हाला किडनीची समस्या नसेल तरच).

दर आठवडय़ाला किमान 150 मिनिटे मध्यम-तीव्रतेचा व्यायाम (जसे की वेगाने चालणे, सायकल चालवणे किंवा पोहणे) करण्याचे ध्येय ठेवा. तणाव कमी करण्यासाठी दीर्घ श्वास घेणे, ध्यान (मेडिटेशन), योग पद्धतींचा सराव करा. शीर्षासन शक्यतो करू नये. रक्तवाहिन्यांचे रक्षण करण्यासाठी धूम्रपान पूर्णपणे बंद करा.

डायुरेटिक्स (लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे) आणि रक्तदाब कमी करण्यासाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत. त्यासाठी योग्य तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. मनाला वाटले म्हणून अचानक औषध बंद करू नये. उच्च रक्तदाबाची औषधे अचानक बंद केल्याने रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकतो (याला रिबाऊंड हायपरटेंशन म्हणतात).

आपले दिवसभरात वेगवेगळ्या वेळाना घरी रक्तदाब तपासा. त्याचे एक टेबल बनवा म्हणजे त्यावरून डॉक्टरांना निदान करणे सोपे जाईल.

[email protected]