
सामना प्रतिनिधी । हिंगोली
महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या हितासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांनी सातत्याने संघर्ष करून न्याय मिळवून दिला आहे. शेतकरी बांधवांनी आगामी काळात शिवसेनेच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहन शिवसेनेचे हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी केले.
शिवसेनेचे जिल्हासंपर्कप्रमुख आनंदराव जाधव हे दोन दिवसाच्या दौर्यासाठी शनिवारी हिंगोलीत आले आहेत. हिंगोली विधानसभा क्षेत्रातील सेनगाव तालुक्यात संपर्क प्रमुख जाधव यांनी शिवसंपर्क अभियान राबवून झंझावती दौरा करत शेतकरी व नागरीक तसेच शिवसैनिकांशी संवाद साधला. यासोबतच शाखांचे उद्घाटनही करण्यात आले. जवळा बुद्रुक, पळशी, आजेगाव येथे शिवसंपर्क अभियानानिमित्त बैठका घेण्यात आल्या. तर खैरखेडा, म्हाळशी, शेगांव खोडके येथे शिवसेना शाखांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जाधव यांच्या समवेत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दिलीप बांगर, लोकसभा संघटक डॉ.बी.डी.चव्हाण, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश उर्फ भैय्या पाटील गोरेगावकर, युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी दिलीप घुगे, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, संदेश देशमुख, तालुकाप्रमुख संतोष देवकर, आनंदराव जगताप, कृउबाचे माजी सभापती रामेश्वर शिंदे, विधानसभा संघटक डॉ.रमेश शिंदे, जि.प.सभापती प्रतिनिधी भानुदास जाधव, नंदकिशोर खिल्लारे, पिंटु गुजर, गजानन भोसले, जगन्नाथ देशमुख, प्रविण महाजन यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना संपर्कप्रमुख जाधव म्हणाले की, शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्य नागरीक व शेतकर्यांच्या कल्याणासाठी आवाज उठविला आहे. शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीनुसार शिवसेना शाखेच्या माध्यमातुन गोरगरीबांच्या अडचणी नेहमीच सोडविल्या जाव्यात तसेच पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार शिवसेना शाखेच्या अंतर्गत कार्यरत पदाधिकार्यांनी शासकीय योजनांचा लाभ गरजु लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.
आगामी काळात येणार्या निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखविण्यासाठी सज्ज रहावे असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाला संबंधीत गावांमधील नागरीक, शेतकरी, शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान, उद्या हिंगोली तालुक्यातील उमरा वाबळे व हिंगोली शहरातील शाखांचे उद्घाटन संपर्कप्रमुख जाधव यांच्या हस्ते होणार आहे.



























































