चंद्रपूर : जिल्हा परिषदेनं प्रत्येक कर्मचा-यास केले ओळखपत्र सक्तीचं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

कार्यालयात येणा-या नागरिकांना अधिकारी आणि कर्मचा-यांची ओळख व्हावी, यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेनं प्रत्येक कर्मचा-यास ओळखपत्र सक्तीचं केलं. यामुळं प्रत्येक अधिकारी-कर्मचारी गळ्यात ओळखपत्र घालून दिसला, तर काहींनी कॅमेरा समोर येताच ओळखपत्राची शोधाशोध केली.

राज्य शासनानं तीन वर्षांपूर्वीच शासकीय कर्मचा-यांना ओळखपत्र सक्तीचं केलं होतं. मात्र, त्याकडे डोळेझाक झाली. पण सामान्य प्रशासनानं पुन्हा यासंदर्भात निर्देश दिल्यानंतर चंद्रपूर जिल्हा परिषदेनं यावर तातडीनं आदेश काढून सर्व अधिका-यांना आणि कर्मचा-यांना ओळखपत्र सक्तीचं केलं. त्यामुळं आज या संस्थेतील बहुतांशी कर्मचारी गळ्यात ओळखपत्र घालून दिसले. या ओळखपत्रात संस्थेचं नाव, कर्मचा-याचं नावं, त्याचा विभाग यांची माहिती आहे. त्यामुळं जिल्हा परिषदेत कामासाठी येणा-या नागरिकांना कर्मचा-यांची सहज ओळख होऊ शकते. शिवाय एक शिस्तीचा भाग म्हणूनही हा निर्णय कर्मचा-यांना भावला. शासनाच्या अनेक निर्णयांना एरव्ही हरताळ फासला जातो. फार गांभीर्यानं त्यांची अंमलबजावणी होत नाही. अशी उदासीनता ब-याच कर्मचा-यांत दिसून येते. इथंही दिसून आली. कॅमेरा जिल्हा परिषदेत फिरताना काही उदासीन कर्मचाऱ्यांना ओळखपत्राची आठवण झाली आणि लगेच शोधाशोध करून तो घातला. तर अनेक जण पानटपरीवर दिसले. अशा उदासीन कर्मचा-यांवर सध्याच कारवाईची भूमिका नसली, तरी येत्या काळात हा निर्णय राबवताना कसूर करणा-या कर्मचा-यांवर कारवाई केली जाणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.