न्यायालयाचे स्थगिती आदेश, तरीही पालिकेने बांधकाम तोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jcb-municipal-corporation

सामना प्रतिनिधी । मुंबई

न्यायालयाचे स्थगिती आदेश असताना मालाड लिंक रोड जवळील दोन हजार चौरस फुटांचे बांधकाम पालिकेने तोडल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. याबाबत रहिवासी जनार्दन सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयात आज याचिका दाखल केली आहे.

मालाड येथे 1957 मध्ये या दुमजली चाळीचे बांधकाम केल्याचे जनार्दन सावंत यांचे म्हणणे आहे. या ठिकाणी आठ रूम होते. हे बांधकाम बेकायदा असल्याची नोटीस न देता पालिकेने थेट बांधकाम तोडण्याची कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. याविरोधात सावंत यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने निर्णय देताना पुढील आदेश येईपर्यंत बांधकाम तोडण्याच्या कारवाईस स्थगितीचे आदेश मे 2018 मध्ये दिले. मात्र सध्या ‘पी’ दक्षिण वॉर्ड अधिकाऱयांकडून संबंधित बांधकाम जमिनदोस्त करण्याची कारवाई सुरूच असल्याचे सावंत यांनी सांगितले. ‘पी’ दक्षिण विभागातील संबंधित अधिकारी आपल्याकडून पैसे वसूल करण्यासाठी कारवाई करीत असल्याचा आरोप करीत सावंत यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान, याबाबत संबंधित पालिका अधिकाऱयांशी संपर्क केला असता त्यांनी न्यायालयाचे स्थगिती आदेश असताना कोणतीही कारवाई पालिकेकडून केली जात नसल्याचे सांगण्यात आले.