जामखेड- रुग्णालयाकडून सामान्यांची बेसुमार लूट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी, जामखेड

जामखेड शहरातील ओम रुग्णालयामध्ये तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य रुग्णांची बेसुमार आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे या रुग्णालयाची चौकशी करून कडक कारवाई करावी अन्यथा महात्मा फुले योजनेचे आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांनी या आंदोलनाबाबत लेखी निवेदन तहसीलदारांकडे सोपवले आहे. ओम रुग्णालयामध्ये परिसरातील रुग्णांना माफक दरात सुविधा पुरवित आहोत. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचे काम शासकीय नियमानुसार सुरू आहे. रुग्णालयाची बदनामी केल्या प्रकरणी शेतकरी संघटनेच्या चार कार्यकर्ते यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहे, अशी माहिती ओम रुग्णालयाचे संचालक संदिप ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे शेतकरी संघटना व ओम रुग्णालय यांच्यात चांगलेच वादंग रंगले आहे.

शहरातील ओम रुग्णालयामध्ये महात्मा फुले जीवनदायी योजनेचे मंजुरी मिळाली आहे. अडीच महिन्यापूर्वी पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु आतापर्यंत फक्त तीनच रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या रुग्णालयामध्ये अनेक गैरसोयी आहेत. तज्ज्ञ डॉक्टर नाहीत, ऑपरेशन थिएटर नाही, प्रशिक्षित कर्मचारी नाहीत, पार्किंगची सोय नाही, अग्निशमन यंत्रणा नाही. तसेच रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते, आर्थिक लुटमार होते, अवास्तव बिल आकारले जाते. त्यामुळे त्वरित संबंधित रुग्णालयाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. अन्यथा महात्मा फुले योजनेचे आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयातच लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, तालूकाध्यक्ष ऋषिकेश डुचे, जनार्दन भोंडवे, हनुमान उगले यांनी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

यानंतर ओम रुग्णालयचे संचालक संदिप ठोंबरे यांनी पत्रकार परिषद घेऊन वरील आरोपाचे खंडन केले आहे. शेतकरी संघटनेच्या चार कार्यकर्त्यांच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ठोंबरे यांनी दिली. ठोंबरे म्हणाले की, मी साडेचार वर्षांपासून हे रुग्णालय चालवत आहे. रुग्णालय दरवर्षी एक नवीन युनीट सुरू करत आहे. ही प्रगती काही विघ्नसंतोषी लोकांना सहन होत नाही. आमच्याकडे दोन एम. डी. डॉक्टर आहेत, एक ऑर्थोपेडिक, दोन आरएमओ व प्रशिक्षित स्टाफ आहे. शासकीय नियमानुसार आम्ही महात्मा फुले जीवनदायी योजनेचे काम करीत आहोत. सर्व काही ठीक आसताना शेतकरी संघटनेच्या चार कार्यकर्ते यांनी मुद्दामच रुग्णालयाची बदनामी चालवली आहे. त्यामुळे मी चार व्यक्तींविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार आहे असे ठोंबरे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.