देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या लाचखोर अधिकाऱ्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब महानवार तसेच देवळाली प्रवरा नगर परिषदेचा सहाय्यक फायरमन मुकूंद मुसमाडे या दोघांना दोन लाख रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी 1.30 वाजता राहुरी फॅक्टरीतील सेंट्रल बँक शाखेसमोर ही घटना घडली. मे 2018 मध्ये राहाता येथील घनकचरा सफाई ई निविदा मंजूर करण्यात आली होती. 1 डिसेंबर 2018 मध्ये संबधीत ठेकेदाराकडून राहाता शहरातील सफाईचे काम सुरू झाले होते. मात्र, कामासंदर्भात तक्रार आल्याने संबंधीत ठेकेदाराला 5 जानेवारी 2019 रोजी काम बंदची नोटीस देण्यात आली होती.

दरम्यानच्या काळात मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांनी ठेकेदाराला बोलावून माझ्याकडे जिल्हा नियोजनचा अतिरिक्त कारभार असल्याने ई निविदा कामाला मदत करतो, त्याबदल्यात त्यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत संबंधीत ठेकेदाराने लाच लुचपत विभागाकडे तक्रार नोंदवल्याने नाशिक लाच लुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले,अप्पर पोलीस अधिक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक किशोर चौधरी,पोलीस निरीक्षक शाम पवरे, पोलीस निरीक्षक दिपक कराडे,पोलीस कॉन्सटेबल प्रशांत जाधव,तन्वीर शेख,रमेश चौधरी,विजय गंगुल,राधा खेमनर,अशोक रक्ताटे यांच्या पथकाने बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान राहुरी फॅक्टरी येथील सेंट्रल बँक शाखेसमोर सापळा लावला होता.

मुख्याधिकारी महानवार याने देवळाली प्रवरा नगर परिषदेचा फायरमन मुकूंद मुसमाडे याला 2 लाख रूपयांची लाच स्विकारण्यास सांगितले होते.मुसमाडे याने लाच स्विकारताच लाच लुचपत विभागाच्या पथकाने मुसमाडे यास रंगेहात पकडले.या पथकाने मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यालाही ताब्यात घेतले. लाच लुचपत विभागाच्या सापळ्यात सापडलेल्या नानासाहेब महानवार याने राहुरी येथे काहीकाळ मुख्याधिकारी म्हणुन पदभार सांभाळला आहे.या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे.