
प्रार्थना बेहरे
मधुचंद्र म्हणजे-दोघांनाही फिरायची आवड असल्याने एकमेकांसाठी दिलेला वेळ.
प्लॅनिंग कसे केले? लग्नासाठी भेटलो तेव्हा मला अभीने विचारले होते तुला फिरायला आवडते का तेव्हा मी बरेच देश फिरलेय पण फक्त मॅपवर असे उत्तर दिले होते. पण अभीने मला चार वेगवेगळे देश फिरवून सरप्राईजच दिले होते. न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि थायलंड. आम्ही 42 दिवसांसाठी सुट्टीवर गेलो होतो.
आवडलेले ठिकाण?-न्यूझिलंड. तिथे घालवलेले अठरा दिवस कायम स्मरणात राहतील. न्यूझीलंडमध्ये दर दिवशी आम्ही दोघं वेगवेगळ्या शहरात जायचो. तिथे तंबूत राहायचो मजा आली. शिवाय माझा वाढदिवसही खूप खास पद्धतीने तिथे साजरा केला होता.
मधुचंद्रासाठी शॉपिंग-खरं तर तेवढा वेळ आमच्याकडे नव्हता आम्ही इथून जाताना खूप मोजके कपडे घेऊन गेलो होतो. त्यामुळे जी काही शॉपिंग केली ती त्या-त्या देशात जाऊन केली.
काही खास क्षण-माझ्या नवऱयाने ऑस्ट्रेलियात ड्रोन कॅमेरा विकत घेतला आणि आम्ही न्यूझीलंडचे सगळे शूट केले आहे. इतकं आम्हाला न्यूझीलंड आवडले.
मधुचंद्र हवाच की…. माझ्या मते हवाच. लग्नानंतरचे ते काही दिवस पुन्हा व्यस्त जीवनशैलीत मिळतीलच असे नसते. लग्नानंतर एकमेकांना ओळखण्यासाठी ते दिवस खरोखरच महत्त्वाचे असतात. शिवाय लग्नानंतरचा उत्साह वेगळा असतो. भविष्यातील काही चांगल्या क्षणांमध्ये हे क्षण सगळ्यात आधी असतात. त्यामुऴे तो हवाच.
एकमेकांशी नव्याने ओळख-खरं तर अभी आणि मी लग्नाआधी भेटलो होतो, फिरलो होतो. पण चार महिन्यातच आमचे लग्न ठरले. लग्नानंतर नक्कीच नव्याने ओळख असते. आपण मधुचंद्राला जाताना चोवीस तास एकमेकांसोबत असतो. त्या दरम्यान एकमेकांच्या सवयी कळतात. चांगले ओळखायला लागतो. ती नव्यानेच ओळख असते.
किती दिवस द्यावेत… हे प्रत्येकाच्या वेळ आणि बजेटवर अवलंबून असते. पण महत्त्वाचे असते ते एकमेकांसोबत वेळ घालवणे. मग चार दिवस असो, दहा दिवस असो किंवा महिना. महत्त्वाचे असते ते जोडीदारासोबत वेळ घालवणे.
तिथली आठवण- न्यूझीलंडचा ताऊपो तलाव. ही जागा खूप छान आणि लक्षात राहण्यासारखी आहे. तिथे खूप मोठा धबधबा आहे. आम्ही तिथे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गेलो होतो. त्यामुळे तशा प्रकारचे कपडे घातले होते. पण तिथे गेल्यावर उणे तीन अंश एवढी थंडी होती. आम्ही तंबूत अक्षरशः गारठलो होतो. शेवटी गाडीत हिटर लावून बसलो. एवढय़ा थंडीची कल्पनाच नव्हती. मग दुसऱया दिवशी गरम कपडय़ांची खरेदी केली होती. ती आठवण आम्ही विसरुच शकत नाही.
तिथला आवडलेला खाद्यपदार्थ-मी शाकाहारी आहे. त्यामुळे न्यूझीलंडला मला खाण्याचा प्रॉब्लेम व्हायचा. पण तिथे फळं खूप छान आणि ताजी मिळतात. त्यामुळे सॅलडवर फार भर दिला होता. ते सॅलड मला एवढे आवडले की मी तशा प्रकारचे सॅलड कुठेच खाल्ले नाही.
अनोळखी ठिकाण की रोमॅन्टिझम- नक्कीच रोमॅन्टिझम. ते तुम्ही कुठेही करु शकता त्यासाठी जागा महत्वाची नसते. पण अनोळखी जागेवरचा अनुभवही वेगळा असतो. तिथले वातावरण, तिथल्या आठवणी या खास असतात.
जोडीदाराची खास आठवण?-अभी कॅमेऱयातून शूट करत होता. त्याने एका ठिकाणी मला शूटसाठी उभं राहिला सांगितलं आणि त्याने सांगितलेले मला न कळल्यामुळे मी पाठ करुन उभी राहिले. त्यावेळी तो माझ्यावर प्रचंड वैतागला आणि आमच्यात वाद झाला. नंतर त्याने मला समजावून सांगितले त्यावेळी मला त्याच्याबद्दल कळलं की तो तांत्रिकदृष्टय़ा फार हुशार आहे. त्याच्यासोबत कधी काम करण्याचा अनुभव नसल्याने मला त्याचा अनुभव नव्हता. पण त्या दिवसापासून मी त्याच्या कामाची फॅन झाले.
एकमेकांसाठी घेतलेली भेटवस्तू-मला वाटलं होतं की मुलीच खूप शॉपिंग करतात पण अभीला भेटल्यावर कळले की मुलंही शॉपिंग करतात. आम्ही बाहेर गेल्यावर खूप शॉपिंग केली. माझ्यापेक्षा अभीच खूप शॉपिंग करायचा. मला त्याला सांगावे लागायचे आता पुरे झाले. कपडय़ांबरोबर, घरासाठी युनिक गोष्टीही आम्ही घेतल्या होत्या.
मधुचंद्रानंतरचा संसारातील जोडीदार-मी असं म्हणेन की त्याच्यासाठी पहिलं काम आणि नंतर प्रेम. खरं तर आम्ही दोघंही कामाला प्राधान्य देतो. अभी जेव्हा माझ्यासोबत असतो तेव्हा तो शंभर टक्के माझ्यासोबतच असतो. त्यावेळी काम मध्ये येत नाही आणि जेव्हा तो कामात असतो तेव्हा तो कामातच असतो. त्यामुळे मला त्याचा अभिमान आहे.
























































