जिल्ह्यात भूजल पातळीत होणारी घट भविष्यासाठी चिंताजनक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। अलिबाग

रायगड जिल्हयात तीन हजार मिलिमीटर एवढा प्रचंड पाऊस पडत असूनही जानेवारीपासूनच पाण्यासाठी नागरिकांना धावाधाव करावी लागत आहे. जिल्ह्यात वाढलेले सिमेंट काँक्रीटचे जंगल, जंगलाची होत असलेली जंगलतोड तसेच भूगर्भातील होणारा बेसुमार पाण्याचा उपसा यामुळे रायगड जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात कमालीची घट होत असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या पहाणीत आढळून आले आहे. डिसेंबरमध्ये घेतलेल्या नोंदी नुसार मागील 5 वर्षाच्‍या तुलनेत यावर्षी भूजल पातळीत घट 0.49 मीटर दिसून येते आहे. भूजल संपतीची दरवर्षी वाढत जाणारी लुट ही भविष्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जाणारी मोठी समस्या सध्या जिल्ह्यासमोर उभी राहली आहे.

रायगड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना, पाणी आडवा पाणी जिरवा, यासारख्या योजना राबवण्यात आल्या आहेत, तरीही जलसाठ्यात भर पडलेली नसल्याचे अहवालावरुन आढळून येत आहे रायगड जिल्हा हा मुख्यत्वेकरुन बॅसाल्ट नावाच्या अग्नीजन्य खडकाने व्यापलेला आहे. या खडकाची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कमी असते. तथापि प्रामुख्याने म्हसळा, श्रीवर्धन, तळा, व मुरुड या तालुक्यामध्ये डोंगरमाथ्यावर लॅटेराईट या प्रकाराचा खडक आढळतो. या खडकात काहीप्रमाणात पाणी साचून राहतो. परंतु बेसुमार होणारी वृक्षतोड यामुळे डोंगर माथ्यावर पडणारे पावसाचे पाणी थेट समुद्रात वाहून जात असल्याने विक्रमी पडणार्‍या पावसाचे पाणी फारसे जमीनीत मुरले जात नाही.

सर्वाधिक पाऊस माथेरान येथे 4000 ते 4500 मिमी. दरम्यान पडतो; परंतु या परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी मागील पाच वर्षाच्या सरासरीने 0.12 मीटरने घटली आहे. अलिबाग, उरण या तालुक्यातील भूगर्भात गोडे पाणी झपाट्याने कमी होत आहे. गोड्या पाण्याची जागा खार्‍या पाण्याने घेतल्याने बोअरवेल, विहिरी यांना खारे पाणी लागण्याचे प्रमाण वाढले आहे.

रायगडमध्ये 60 टक्के पाणी पुरवठा विहिर, बोअरवेल यांच्यावर सुरु करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांमधून केले जाते. यामुळे भूगर्भात कमी झालेल्या पाणी साठ्याचा परिणाम या जलस्त्रोतांवर होत आहे. भविष्यात ही घट सातत्याने वाढल्यास रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती भूगर्भ सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने आपल्या अहवालात नोंदवली आहे.

जिल्ह्यात भूजल पातळी वाढविण्यासाठी जंगलतोड, वणवे लावणे कमी होणे गरजेचे आहे. तसेच वाढते सिमेंटचे जंगल यावरही उपाययोजना होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात पडत असलेला पाऊस जिरला गेला नाही तर भविष्यात रायगड जिल्हाही पाण्यासाठी तहानलेला राहण्यास वेळ लागणार नाही. यावर जिल्हा प्रशासनाकडून वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे.