
सामना प्रतिनिधी । नाशिक
निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर येथे आज सकाळी विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाऊण तासात बाहेर काढून पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
नांदूरमध्यमेश्वर येथील शेतकरी राजेंद्र पंढरीनाथ नाईकवाडे यांच्या विहिरीत शुक्रवारी सकाळी ७ वाजता एक बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनरक्षक प्रसाद पाटील, विजय टेकनर, गोपाळ हरगावकर, वनमजूर भैय्या शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने या पथकाने क्रेनद्वारे सुमारे पाऊण तासात त्याला विहिरीबाहेर काढले. हा चार वर्षे वयाचा नर बिबट्या आहे. पाण्याच्या, तसेच भक्ष्याच्या शोधात तो विहिरीत पडल्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्याला पिंजऱ्यात जेरबंद करून निफाड येथील रोपवाटिकेत आणले आहे, अशी माहिती संजय भंडारी यांनी दिली.




























































