
सामना प्रतिनिधी, बीड
दुष्काळाने होरपळलेल्या बीड जिल्ह्यामध्ये पशुधन वाचवण्यासाठी तब्बल 859 चारा छावण्यांना मंजूरी देण्यात आली आहे. यातील 320 चारा छावण्या प्रत्यक्षात सुरू झालेल्या आहेत. प्रत्येक चारा छावणीमध्ये अटी आणि शर्थीचे पालन केले जाते का, जनावरांना चारा आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे का, याची झाडाझडती घेण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी आस्तितकुमार पांडे यांनी भरारी पथके तैनात केली आहेत. अप्पर जिल्हाधिकारी हे भरारी पथकाचे प्रमुख असणार आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळाने होरपळ सुरू केली आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी झगडावे लागत आहे. यापेक्षा विदारक परिस्थिती जनावरांची निर्माण झाली आहे. पशुधन वाचवण्यासाठी उशिरा का होईना सरकारने चारा छावण्या उपलब्ध करून दिल्या आहेत. बीड जिल्ह्यात 859 चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यापैकी 320 चारा छावण्या प्रत्यक्षात सुरूही झाल्या आहेत. चारा छावणीमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांचे केवळ पाच जनावरांचा समावेश असणार आहे.
पशुधन वाचवण्यासाठी उभारण्यात आलेल्या चारा छावण्यांमध्ये घोटाळे होवू नये याची खबरदारी जिल्हा प्रशासन घेत आहे. निवडणुकीच्या धामधुमीतही दुष्काळी उपाययोजनांसाठी जिल्हाधिकारी विशेष लक्ष देत आहेत. चारा छावण्यांच्या झाडाझडतीसाठी जिल्हा प्रशासनाने भरारी पथके नियुक्त केली आहेत. ही भरारी पथके चारा छावणीमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांची किती जनावरे आहेत. छावणीमध्ये एकुण जनावरांची संख्या किती आहे, नियमानुसार जनावरे बॅरिकेटनुसार समाविष्ट केली आहेत का, बॅरिकेटमधील जनावरांना ऊन आणि पावसापासून संरक्षण दिले गेले का, नियमानुसार नियमित पशुखाद्य दिले जाते का, चारा आणि पाण्याची उपलब्धता आणि त्याचा दर्जा राखला जातो का याची झाडाझडती घेतली जाणार आहे.
चार जणांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे हे पथक प्रमुख असणार आहेत. पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संतोष पालवे, जिल्हा पशुसंवर्धक उपायुक्त डॉ.नागनाथ पानढवळे, नायब तहसीलदार संतोष धर्माधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक चारा छावण्यांची अचानक तपासणी करणार आहे आणि तो अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला जाणार आहे. पथक तैनात करण्यात आल्यामुळे चारा छावण्यांची व्यवस्था सुधारणार असून नियमितता निर्माण होणार आहे.































































