
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
उरण तालुक्यातील चिर्ले गावाजवळ असलेल्या दगडांच्या क्वारीची दरड कोसळून दोन कामगार ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवार रात्री 8.30 वाजता घडली. यामध्ये इस्माईल इसराईल अन्सारी (22) रा. झारखंड आणि इस्तेखार साबीर अन्सारी (20) रा. हजारीबाग, झारखंड हे दोन कामगार जागीच ठार झाले. या बाबत क्वारीचे मालक आणि ठेकेदार यांच्यावर भा.द.वि. कलम 304 नुसार कामात निष्काळजीपणा केलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेएनपीटी – पळस्पे या एनएच 4 बी या महामार्गालगत चिर्ले गावाजवळ डोलमार्क कंटेनर यार्डच्या पाठीमागे ही दगडांची क्वारी होती. रात्रीच्या वेळेत पोकलेन मशिनने दगड फोडण्याचे काम सूरू होते. यावेळेस या क्वारीत दगड भरण्याचे काम सूरू होते. त्याच वेळेला रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास क्वारीची दरड या पोकलन मशिनवर पडली. यामध्ये पोकलन मशिन चालवणारा चालक इस्माईल अन्सारी आणि त्याचा साथिदार इस्तेखार अन्सारी हे दोघेजण जागीच ठार झाले. सुदैवाने हा अपघात रात्रीच्या वेळेला झाला. दिवसा झाला असता तर आणखी मोठा अनर्थ झाला असता. या क्वारीमध्ये अनेक कामगार दगड भरण्यासाठी असतात. या क्वारीची दरड कोसळण्याच्या अवस्थेत असताना सुद्धा धोकादायक रित्या रात्री कोणत्याही सुरक्षेच्या साधनांशिवाय येथे दगड फोडण्याचे काम केल्यामुळेच हा अपघात झाला असल्याचे येथिल कामगारांचे म्हणणे आहे. उरण तालुक्यात अशा प्रकारे अनेक दगडाच्या क्वारी असून येथे बिनधास्तपणे उत्खनन सूरू असते. या क्वारींना शासनाची परवानगी देखिल नसल्याचे बोलले जाते. या बाबत उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


























































