कन्नड संभाषणाने केला हत्येचा उलगडा, तीन राज्ये फिरून केले मारेकऱ्यांना गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

बोरिवलीत ज्येष्ठ नागरिकाच्या हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपींनी कन्नड भाषेत संभाषण केले. हाच धागा पकडून पोलिसांनी कौशल्याचा वापर करत तीन राज्ये फिरून अवघ्या सहा दिवसांत मारेकऱयांना गजाआड केले. महेश चंद्र गौडा, अनिलकुमार गौडा आणि किरणकुमार गौडा अशी त्या तिघांची नावे आहेत. लुटमारीच्या हेतूने त्या तिघांनी हत्या केल्याचे उघड झाले आहे.

वामन जोशी (70) हे बोरिवलीत राहत होते. त्यांचे बोरिवली पश्चिम येथे छोटे हॉटेल आहे. 18 एप्रिलला ते घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांच्या चेहऱयावर जखमा होत्या. त्यामुळे त्यांची हत्या केली असावी, असा बोरिवली पोलिसांना संशय होता. शवविच्छेदन अहवालात त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले. बोरिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. अतिरिक्त आयुक्त राजेश प्रधान, परिमंडळ 11चे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी तपासाकरिता पथक तयार केले. सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर मोरे यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण डुंबरे, पोलीस निरीक्षक महेश तावडे, पोलीस निरीक्षक रवी अडाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक घनशाम नायर, पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोरे, निरगुडे, चव्हाण, पोलीस हवालदार सुशील सावंत, प्रकाश जांभळे, पोलीस नाईक सचिन खताते, पोलीस शिपाई किरण दळवी, नितीन मोरे, लक्ष्मण तडवी, सर्फराज खान, सचिन गुंडगे, राजेंद्र केसरे, विक्रांत मेहेर, गाढवे, जगताप, महिला पोलीस शिपाई पल्लवी कोल्हे यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सुरक्षा रक्षकासह काही नोकरांची चौकशी केली.

महेश हा पूर्वी वामन यांच्याकडे कामाला होता. मात्र तो वर्षभरापूर्वी नोकरी सोडून गेला. मात्र तो कोठे आहे याचा ठावठिकाणा नव्हता. चौकशी दरम्यान एकाने पोलिसांना महत्त्वपूर्व माहिती दिली. दारू प्यायलेले हे तीन जण कन्नड भाषेत संभाषण करत होते, हाच धागा पकडत पोलिसांनी तपास पुढे नेला. संशयिताचे वर्णन आणि त्या व्यक्तीने दिलेली माहिती ही जुळली. कौशल्याचा वापर करीत तीन राज्ये फिरून अखेर मारेकऱयांना तामिळनाडूच्या दुर्गम भागातील कोचमपल्ली येथून ताब्यात घेतले. तिघांना अटक करून आज ट्रान्झिस्ट रिमांडवर मुंबईला आणले. शुक्रवारी त्या तिघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

…अन् महेशचा अंदाज फसला
महेश हा आठ वर्षांपासून वामन यांच्या हॉटेलमध्ये कामाला होता. वर्षभरापूर्वी तो नोकरी सोडून गेला होता. वामन यांच्याकडे रोजचे पैसे येत असल्याचे महेशला माहीत होते. पण अलीकडच्या काळात वामन हे दैनंदिन खर्चापुरती रक्कम स्वतःकडे ठेवत असायचे. उर्वरित रक्कम दर तीन दिवसांनी बँकेत जमा करत होते. याची महेशला कल्पना होती. महेश आणि अनिललाला बंगलोरला फ्रँकीचे दुकान सुरू करायचे होते. त्यातच तो कर्जबाजारी झाला होता. पैशाकरता लुटमारीच्या हेतूने ते तिघे वामन यांच्या घरात घुसले. वामन यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर त्या तिघांनी त्यांची हत्या केली. हत्येच्या एक दिवस आधी ते तिघे मुंबईत आले होते.

शेतात दोन किलोमीटरपर्यंत केला पाठलाग
आरोपी हे तामीळनाडू येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक बंगलोर येथून तामीळनाडूला गेले. पोलिसांनी भाषेची अडचण येऊ नये म्हणून एका भाषांतरकराची मदत घेतली. हातवारे आणि कौशल्याचा वापर करत त्या तिघांची माहिती काढली. ते तिघेही कोचमपल्ली येथून दुर्गम गावातील शेतात लपून बसले होते. गावकऱयांना पोलिसांनी त्या आरोपींबाबत माहिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी शेतात दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग करून त्या तिघांच्या मुसक्या आवळल्या.