
सामना प्रतिनिधी । देगलुर
शहरातील सरसंबे कुटुंबातील एकाचा विवाह मंगळवारी हैदराबाद येथे होता. या विवाह सोहळ्यासाठी जात असताना सरसंबे कुटुंबीयातील काही सदस्यांवर काळाने घाला घातला. या दुर्दैवी घटनेत सरसंबे कुटुंबातील दोघींचा आणि चालक असे तिघेजण ठार झालेत. ही घटना दिनांक 27 एप्रिल शनिवार रोजी सकाळी आठच्या सुमारास नांदेड हैद्राबाद महामार्गावर शंकरम पेठ येथे घडली.
देगलूर शहरातील लाइन गल्ली भागातील सरसंबे कुटुंबातील मल्लप्पा सरसंबे यांच्या मुलांचा विवाह रविवारी 28 एप्रिल रोजी हैदराबाद येथे संपन्न होणार होते. यासाठी सरसंबे कुटुंबातील काही मंडळी दिनांक 27 एप्रिल शनिवार रोजी सकाळी क्रुझर गाडीने हैदराबादला जात होते. दरम्यान शंकरमपेठ जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची व क्रुझरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात शिवानी बंडप्पा सरसंबे वय 18 वर्षे व क्रुझर चालक शेख मनान ( 32)हे दोघे जागीच ठार झाले. यातील काही गंभीर जखमींना हैदराबाद येथे उपचारासाठी नेण्यात आले असता तेथे उपचारादरम्यान रजनी गुंडपा सरसंबे (वय 40) असे सरसंबे कुटुंबातील दोघींवर काळाने घाला घातला. तर उर्वरित गंभीर जखमींवर हैद्राबाद येथील खाजगी दवाखान्यात उपचार चालू आहे.































































