
सामना ऑनलाईन । कराची
पाकिस्तानच्या एका डॉक्टरने त्याच्या 90 रुग्णांना एचआयव्ही बाधित इंजेक्शन टोचल्याची घटना घडली आहे. या 90 रुग्णांमध्ये 65 मुलांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या आरोग्य विभागाच्या तक्रारीवरून या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानमधील लर्काना या जिल्ह्यातील 18 मुलांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. सतत आजारी असल्याने त्यांना अशक्तपणा येत असल्याची तक्रार होती. वैद्यकीय चाचणीत धक्कादायक अहवाल समोर आला. कारण, ही 18 मुलं एड्सबाधित असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं होतं. या मुलांच्या पालकांची मात्र एचआयव्ही चाचणी निगेटिव्ह आली होती. तेव्हा स्थानिक आरोग्य विभागाने या प्रकरणाचा छडा लावला. तेव्हा हा भयंकर प्रकार समोर आला. हा डॉक्टर स्वतः एचआयव्ही रुग्ण आहे. त्याने त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णांना एकच इंजेक्शन दिलं. त्यामुळे या 18 मुलांसह अजूनही अनेक जणांना एचआयव्हीची बाधा झाल्याचं समोर आलं. हळूहळू हा आकडा वाढून 90वर गेला.
पोलिसांनी या डॉक्टरला अटक केली असून त्याच्या या कृत्याबद्दल तपास करण्यात येत आहे. पण, स्थानिक आरोग्य विभागाला त्याच्याकडील उर्वरित रुग्णांबाबतही चिंता सतावत असून त्यांनाही एचआयव्हीची बाधा झाल्याचा संशय विभागाला आहे. त्यानुसार विभागाने शोध सुरू केला आहे.
























































