अल्पसंख्याकांचा विश्वास संपादन करावा लागेल, नरेंद्र मोदी यांनी मांडले नव्या सरकारचे व्हिजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशात ज्या पद्धतीने गरीब जनतेचा छळ केला गेला त्याच पद्धतीने अल्पसंख्याकांचाही छळ झाला. त्यांना भीती दाखविली गेली. अल्पसंख्याकांचा नेहमीच ‘व्होटबँक’ म्हणून वापर झाला. त्यांची गळचेपी केली गेली. त्यांच्या शिक्षण, आरोग्य याचा विचार केला गेला नाही. 2019 मध्ये आपल्याला यास छेद द्यायचा आहे. आपल्याला अल्पसंख्याकांचा विश्वास संपादन करायचा आहे असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ‘सबका साथ, सबका विकास’ हाच आपला मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएची महत्त्वपूर्ण बैठक आज संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये पार पडली. या बैठकीला एनडीएतील घटक पक्षांचे सर्व प्रमुख, नेते आणि नवनियुक्त खासदारांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेनेचे संसदीय पक्षनेते खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर व खासदार अनिल देसाई होते.

भाजप संसदीय दलाच्या आणि एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत जे अभूतपूर्व यश मिळाले त्यात ‘एनडीए’च्या घटक पक्षांचा मोठा वाटा आहे. या घटकपक्षांनी मोठा त्याग केला आहे. आणखी मजबूत ‘एनडीए’ बनवूया अशा शब्दांत मोदींनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी बळकट करण्यावर भर दिला.

क्षणचित्रे
– संसदेचा सेंट्रल हॉल खासदार, भाजपशासित मुख्यमंत्री आणि एनडीएतील घटक पक्षांतील नेते यांच्या उपस्थितीने खचाखच भरला होता.
– नरेंद्र मोदी यांचे संसद भवनात आगमन होताच भाजपाध्यक्ष अमित शहा आणि ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी त्यांचे स्वागत केले.
– नवनियुक्त खासदारांमध्ये अनेक नवीन चेहरे आहेत. पहिल्यांदाच ते संसद भवनात प्रवेश करत होते. त्यामुळे ते भवनाच्या प्रवेशद्वारावरच नतमस्तक झाले.
– एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सभागृहात ठेवलेल्या संविधानाच्या प्रतिला वंदन केले.

मुख्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्रातील खासदारांची बैठक
लोकसभा निवडणुकीतील जबरदस्त यशानंतर शनिवारी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक आयोजित केली होती. यामध्ये महाराष्ट्रातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चाही झाली. यानिमित्ताने स्नेहभोजनही आयोजित केले होते. याप्रसंगी खासदार राहुल शेवाळे, गजाजन कीर्तिकर, हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, विनायक राऊत, श्रीरंग बारणे, ओमराजे निंबाळकर, प्रतापराव जाधव आणि अन्य खासदार उपस्थित होते.