
सामना प्रतिनिधी । मुंबई
बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांच्यावर येथील लीलावती रुग्णालयात गुरुवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. पचनसंस्थेशी संबंधित अशा ‘डायवर्टीकुलिटीस’ या आजाराने ग्रस्त असल्याने 75 वर्षीय तनुजा यांना ही शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. या आजारात पोटातील डायवर्टीकुला नावाच्या छोटय़ा पिशव्यांमध्ये संक्रमण होते, जे आतडय़ांच्या भिंतींवर पसरते, असे डॉक्टरांनी सांगितले. एकीकडे काजोल हिचे सासरे वीरू देवगण यांचे 27 मे रोजी निधन झाल्यानंतर आता काजोल यांची आई रुग्णालयात आहे. लीलावती रुग्णालयामधील एका अधिकाऱयाने माहिती देताना सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर तनुजा यांची प्रकृती आता स्थिर असली तरी त्यांना किमान एक आठवडा रुग्णालयातच राहावे लागणार आहे. ओटीपोटात दुखू लागल्यामुळे तनुजा यांना मंगळवारी लागलीच लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यावेळी काजोल तातडीने रुग्णालयात आपल्या आईला भेटायला जात असतानाची छायाचित्रे मंगळवारीच व्हायरल झाली होती.



























































