श्रीस्वामीकृपांकित बाळकृष्णबुवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक वैद्य

सुरत येथे वास्तव्यास असलेल्या ‘पाध्ये’ नामक यजुर्वेदी ब्राह्मण घराण्यामध्ये जन्मलेला बालक पुढे सद्गुरूपदापर्यंत पोहोचेल अशी शक्यता कुणाच्या मनातही डोकावली नसेल. मात्र, नियतीची खेळी नेहमीच अकल्पित आणि अगम्य असते हे पूर्णत्वाने सिद्ध करण्यासाठी 28 ऑक्टोबर 1866 रोजी जन्मलेले हे बालक श्रीअक्कलकोटस्थ स्वामीसंप्रदायामध्ये ‘सद्गुरू’रूपाने स्वामीभक्तांना वंदनीय ठरले.

या नवजात बालकाचे नाव ‘बाळकृष्ण’ ठेवण्यात आले. वडील कट्टर शिवभक्त आणि घरातील आचार-विचार पूर्णतः सनातनी होते. बाळकृष्णाचे प्राथमिक शिक्षण वडिलांच्या देखरेखीखाली सुरत येथे झाले. वडिलबंधू व्यवसायामुळे मुंबईत स्थायिक झाल्याने बाळकृष्णाला पुढील इंग्रजी शिक्षणासाठी त्याच्या काकांनी मुंबईस आणले. आध्यात्मिक वृत्तीच्या या काकांनी बाळकृष्णाचे कॉलेजपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अखंड जिज्ञासा, तीव्र ज्ञानोपासना आणि अभ्यासू वृत्ती यांमुळे बाळकृष्ण बी. ए.ची परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण झाले. त्यांच्या मनांत तत्कालीन सुशिक्षित सुधारकांबद्दल विलक्षण आदर होता. पाश्चात्य वाङ्मयाच्या अध्ययनामुळे त्यांची धार्मिक मते मात्र पूर्णतः बदलली. महर्षी दयानंद सरस्वती यांची व्याख्याने ऐकून बाळकृष्ण कट्टर आर्यसमाजी झाले. घरातील प्रचलित व पारंपरिक आचार-विचार, स्नान-संध्या, पूजा-अर्चा इत्यादी सनातनी कल्पना मागे पडल्या आणि बाळकृष्ण पूर्णपणे नास्तिक बनले.
आपल्या पुतण्यामध्ये दिवसागणिक होणारा बदल त्यांच्या काकांना जाणवत असे. दुःखीकष्टी झालेले चुलते समजुतीच्या चार गोष्टी सांगून बाळकृष्णांचे मन वळविण्याचा प्रयत्न करू लागले, मात्र त्याचा विपरीत परिणाम झाला अन् बाळकृष्ण निरीश्वरवादाकडे अधिकच आकर्षित झाले. त्यांच्यामध्ये झालेला बदल घरातील सर्वांसाठीच चिंतेचा विषय होऊन बसला. योगायोगाने बाळकृष्णांच्या चुलत्यांची भेट रामचंद्र व्यंकटेश बरडकर अर्थात श्रीतात महाराज या सत्पुरुषासोबत झाली. श्रीतात महाराजांवर अक्कलकोटस्थ श्रीस्वामीसमर्थांची कृपा होती, शिवाय त्यांचा अनुग्रहदेखील प्राप्त झाला होता. गृहस्थाश्रमी असूनही परमार्थाचे चोख पालन करणाऱया श्रीतात महाराजांनी श्रीस्वामी समर्थांची उपासना अपार वाढवली. अनेक मुमुक्षंgना मार्गदर्शन करून त्यांची स्वामीउपासना वाढीस लावली तसेच श्रीस्वामीकार्याचा प्रचार व प्रसारही केला. बाळकृष्णांच्या चुलत्यांनादेखील श्रीतात महाराजांकडून अनुग्रह तसेच स्वामीउपासना प्राप्त झाली.

एकदा बाळकृष्णांच्याविषयीची हकीकत चुलत्यांनी श्रीतात महाराजांना सांगितली आणि त्यांना ‘आपण माझ्या पुतण्यास याविषयी काही समजवावे’ अशी कळकळीची प्रार्थना केली. त्यांचे बोलणे ऐकून श्रीतात महाराज एकाएकी संतापले, ‘असल्या कुलांगार नास्तिकाचे मला दर्शनही नको.’ जा, त्याला सांग. तुला ही अवदसा का आठवली? लहानपणी उन्हाचे चटके बसेपर्यंत केलेल्या स्वामी नामस्मरणाचा तुला विसर पडला असला तरीही, माझे सद्गुरु श्रीस्वामीमहाराज यांच्यापाशी तुझ्या उपासनेची नोंद आहे. तेच तुला जीवनमुक्त करून ब्रह्मपदी नेणार आहेत. त्यांचा महान भक्त म्हणून नियतीने तुझे नाव मुक्रर केले आहे आणि तरीही तू असे वागतोस?’

घडलेला प्रसंग चुलत्यांना आश्चर्यचकित करणारा होता, त्यांनी ही गोष्ट बाळकृष्णांच्या कानावर घातली तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. श्रीतातमहाराजांचे सांगणे पूर्णतः सत्य होते. बाळकृष्ण लहान असताना सुरत येथे राहणारी एक वृद्ध स्त्राr अक्कलकोटी जाऊन श्रीस्वामीसमर्थांचे दर्शन घेऊन आली अन् श्रीस्वामीरायांच्या लीला बाळकृष्णांच्या आईला सांगती झाली. शेजारी बसलेला छोटा बाळकृष्ण हे ऐकून प्रभावित झाला अन् आपल्याला श्रीस्वामीसमर्थांचे दर्शन घडावे म्हणून ‘स्वामीसमर्थ माऊली’ हा जप सकाळपासून दुपारी उन्हाचे चटके बसेपर्यंत घराच्या पत्र्यावर बसून करू लागला. अदमासे आठेक वर्षे सुरू असलेला हा नित्यक्रम बाळकृष्ण शिक्षणाकरिता मुंबईस आल्याने खंडीत झाला. ही गोष्ट कुणास फारशी ठाऊकही नव्हती, मात्र श्रीतात महाराजांनी ती अंतसार्क्षित्वाने अचूक ओळखली याची बाळकृष्णांना अपूर्वाई वाटली. जुन्या स्मृती जाग्या झाल्याने एकाएकी त्यांच्यामध्ये विरक्ती आली. आपल्या वर्तनाचा पश्चात्ताप झाल्याने त्यांनी श्रीतात महाराजांना पत्र लिहून क्षमायाचना केली व अनुग्रह होण्याबद्दल प्रार्थना केली. श्रीतात महाराजांनी पत्र वाचले आणि बाळकृष्णांना भेटावयास बोलावले.

श्रीतातमहाराज-बाळकृष्णांच्या पहिल्या भेटीचा प्रसंग अविस्मरणीय होता. इंग्रजी शिक्षणामुळे बुद्धिनिष्ठ व नास्तिक बनलेले, सुकुमार गौरवर्ण कांतीने लक्ष वेधून घेणारे बाळकृष्ण अन् श्रीस्वामीसमर्थांच्या सहवासात ब्रह्मसाक्षात्कार घडूनही गृहस्थाश्रमी, कर्मयोगी, अध्यात्मतेज दर्शविणारी धीरगंभीर मूर्ती अर्थात श्रीतात महाराज यांची भेट झाली. बाळकृष्णांचे आर्यसमाजी तत्त्वज्ञान श्रीतात महाराजांनी ऐकून घेतले. आणि नित्यनेमाप्रमाणे ते भुलेश्वरी मुंबादेवीच्या दर्शनास निघाले. त्या दिवशी त्यांनी बाळकृष्णांनाही सोबत घेतले. गाभाऱयापाशी पोहोचताच श्रीतात महाराजांनी बाळकृष्णांकडे क्रोधीत मुद्रेने पाहिले आणि ते देवीच्या मुखाकडे पाहू लागले. बाळकृष्णांनीही भयभीत होऊन देवीकडे पाहिले तो त्यांना देवीची मुद्रादेखील अक्राळविक्राळ भासू लागली. देवीच्या चेहऱयावरील स्निग्धता व शांतता लोप पावली होती. या विषयी पुढे श्रीबाळकृष्ण महाराज असे म्हणाले होते की, ‘वास्तविक पाषाणमूर्तीस्वरुप असलेली देवी सद्गुरू तात महाराजांचा भाव दाखविण्यासाठी आणि माझ्या नास्तिकतेचा नक्षा उतरविण्यासाठी भयंकर रूप धारण करती झाली की, ते पाहून माझ्या सर्वांगाला कापरे भरले. मी भीतीने गर्भगळीत झालो, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी तक्षणीच सद्गुरू तातमहाराजांचे चरण धरले. मला प्रेमभराने उठवत सद्गुरू म्हणाले, ‘बाळकृष्ण, ऊठ, देवीकडे बघ.’ मी भयभीत होऊन देवीकडे पाहिले तेव्हा ती प्रसन्नवदना मला अतिशय प्रेमळपणे दर्शन देती झाली.
हा प्रसंग बाळकृष्णांचे लौकिक आयुष्य बदलवून गेला. ते सद्गुरूंना शरण गेले. तातमहाराजांनी बाळकृष्णांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांचे गुरूपद स्वीकारले. सद्गुरुंच्या सान्निध्यातून अनुभवप्राप्ती करून घेणे हे बाळकृष्णांचे जीवितकार्य झाले तरीही मुळातल्या बुद्धीवादी वृत्तीमुळे त्यांच्या मनांत डोकावणाऱ्या शंकाकुशंकांचे निरसन तातमहाराज प्रत्यक्ष अनुभूतीने करून देत. एकदा रामायण ग्रंथामध्ये, मारुतीच्या रोमारोमांतून ‘राम’ हा ध्वनी येत असल्याचे वाचून ते शंकित झाल्याचे तातमहाराजांनी अंतर्ज्ञानाने ओळखले अन् बाळकृष्णांना कापसाची उशी फेकून मारली. मात्र, त्या निर्जीव उशीतून ‘श्रीस्वामीसमर्थ’ हा मंजुळ ध्वनी ऐकू येताच बाळकृष्ण बेभान झाले. अष्टभाव जागृत होऊन ते देहभान विसरले आणि पाहता पाहता नास्तिकतेच्या पायरीवरून ब्रह्मसाक्षात्कार स्थितीप्रत येऊन स्थिरावले.
(पूर्वार्ध)
[email protected]