टीम इंडियासाठी काळा दिवस, रायुडूच्या निवृत्तीनंतर गंभीर निवड समितीवर उखडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

टीम इंडियाचा मधल्या फळीतील खेळाडू अंबाती रायुडू याने बुधवारी तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. वर्ल्डकपसाठी संधी न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा असतानाच रायुडूने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. हिंदुस्थानचा माजी सलामीवीर खेळाडू आणि 2011 च्या वर्ल्डकप संघाचा सदस्य गौतम गंभीर याने रायुडूच्या निवृत्तीनंतर एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीवर हल्ला चढवला आहे. निवड समितीतील पाच सदस्यांनी मिळून जेवढ्या धावा केल्या नाहीत तेवढ्या रायुडूने आपल्या कारकीर्दीमध्ये केल्या आहेत, असा टोला गंभीरने लगावला आहे.

अंबाती रायुडूचा क्रिकेटला राम राम, बीसीसीआयवर नाराज असल्याची चर्चा

अंबाती रायुडूने बुधवारी बीसीसीआयला ईमेल पाठवून निवृत्तीची घोषणा केली. या पत्रामध्ये त्याने निवृत्तीचे कारण स्पष्ट केलेले नाही. परंतु वर्ल्डकपमध्ये निवड न झाल्याने व खेळाडू दुखापग्रस्त झाल्यावरही आपल्या नावाचा विचार न केल्यामुळे रायुडूने निवृत्ती जाहीर केल्याची चर्चा रंगत आहे. याच दरम्यान गौतम गंभीरने निवड समितीवर ताशेरे ओढले आहेत.

विश्वचषकादरम्यान संघ निवडीच्या बाबतीत निवड समितीने आपल्याला निराश केल्याचे गौतम गंभीरने म्हटले. निवड समितीमुळेच रायुडूने संन्यास घेतला आहे, त्यांचा निर्णय घेण्याचा तुघलकी अधिकार यास जबाबदार आहे, असे म्हणत गंभीरने निवड समितीवर आसूड ओढले. निवड समितीमधील पाच सदस्यांनी मिळून जेवढ्या धावा केल्या नसतील तेवढ्या धावा एकट्या रायुडूने आपल्या कारकीर्दीत बनवल्या आहेत. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे मला दु:ख झाल्याचेही तो म्हणाला. तसेच दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी ऋषभ पंत आणि मयांक अग्रवालची निवड केली गेली, परंतु रायुडूला डावलले गेले. त्याच्या जागी दुसरा खेळाडू असता तरी त्यालाही या निर्णयाचे दु:ख झाले असते, असेही गंभीर म्हणाला.

गंभीर पुढे म्हणाला, रायुडूने आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तीन शतकं आणि 10 अर्धशतकानंतरही एखाद्या खेळाडूला अशा प्रकारे संन्यास घ्यावा लागत असेल तर हा हिंदुस्थानी क्रिकेटसाठी दु:खद क्षण आहे. रायुडूने 55 एक दिवसीय लढतीत 47 च्या सरासरीने 1694 धावा केल्या आहेत.