कर्नाटकात सरकार शेवटच्या घटका मोजतेय, काँग्रेस-जेडीएसच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरू

कर्नाटकातील राजकीय पटलावर शेवटचा अंक सुरू झाला असून काँग्रेसच्या 21 मंत्र्यांपाठोपाठ जनता दल धर्मनिरपेक्षच्या (जेडीएस) सर्व 9 मंत्र्यांनीही राजीनामे दिले आहेत. हिंदुस्थानी लोकशाहीच्या इतिहासात हा एक विक्रमच आहे. कारण एका दिवसात तब्बल 30 जणांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. दोन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर असलेले मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकार आता शेवटची घटकाच मोजत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. मात्र आमदारांची बंडखोरी शमविण्यासाठी मंत्र्यांच्या राजीनाम्याची खेळी खेळल्याचे जेडीएसच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कर्नाटकातील नाटय़ाचे लोकसभेतही पडसाद उमटले.

काँग्रेस-जेडीएसच्या 13 आमदारांच्या राजीनाम्यानंतर कुमारस्वामी सरकार व्हेंटिलेटरवर गेले आहे. या बंडखोर आमदारांची मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये बडदास्त ठेवण्यात आली होती. त्यातच आज मंत्र्यांच्या राजीनामानाटय़ाचा पुढील अंक घडला.

पक्षहितासाठी आणि मंत्रिमंडळ फेरबदल करण्यासाठी आमच्या मंत्र्यांनी राजीनामे दिल्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते सिद्धरामय्या यांनी सांगितले. पक्ष निरीक्षक के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक झाली त्यात राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याबरोबरही काँग्रेस नेत्यांची चर्चा झाली. दरम्यान, कर्नाटक सरकारमधील काँग्रेसच्या 21 मंत्र्यांपाठोपाठ जेडीएसच्या सर्व 9 मंत्र्यांनीही राजीनामे दिले.

कर्नाटकातील नाटय़ामागे भाजपचा हात नाही – राजनाथ

कर्नाटकमध्ये जे राजकीय नाटय़ घडलेय, त्यामागे भाजपा किंवा केंद्र सरकारची कोणतीही भूमिका नाही, असे स्पष्टीकरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी दिले. पक्षाने कोणत्याही आमदार वा खासदारावर पक्ष बदलण्यासाठी दबाव टाकलेला नाही, असेही ते म्हणाले. कर्नाटकातील राजकीय घडामोडींची सोमवारी लोकसभेत चर्चा झाली. या वेळी राजनाथ सिंह यांनी भाजपाची बाजू मांडली.

काँग्रेस-जेडीएस सरकारने बहुमत गमावले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी तत्काळ राजीनामा द्यावा हीच जनभावना आहे. उद्या (दि. 9) भाजपकडून राज्यभर निदर्शने करण्यात येतील.
– बी. एस. येडियुरप्पा (भाजप प्रदेशाध्यक्ष)

सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन बंडखोर आमदार पुणेमार्गे गोव्याला