पृथ्वीचे गुपित!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< शैलेश माळोदे

डॉ. शैलेश नायक. पृथ्वीच्या गर्भातील गूढ सहज उलगडणारा भूशास्त्रज्ञ.

“हिंदुस्थानमधील आकडेवारी सर्वांना, विशेषतः सर्व संबंधितांना उपलब्ध हवी. तेव्हाच त्याचा खरा फायदा होतो. माझा अनुभव हाच असून त्यामुळे उत्पादकता वाढते.’’ हिंदुस्थानच्या जिओस्पॅशिअल धोरणाविषयी मत व्यक्त करताना डॉ. शैलेश नायक यांनी अगदी स्पष्ट शब्दांत आपले विचार व्यक्त केले. डॉ. शैलेश नायक सध्या बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऍडव्हान्सड् स्टडीजचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. हिंदुस्थान सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव आणि पृथ्वी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनदेखील त्यांनी आपली मोहर देशाच्या वैज्ञानिक धोरण पटलावर उमटवली आहे. इस्रोचे प्रभारी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी सुमारे 12 दिवस कार्यभार सांभाळला आहे.

भूशास्त्र्ाामध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर मी 1980 साली एम.एस. विद्यापीठ, वडोदरामधून त्याच विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली. समुद्र विज्ञान, सुदूर संवेदन या विषयांतील प्रावीण्य माझ्या दृष्टीने खूपच महत्त्वाचं होतं.’’ डॉ. शैलेश नायक यांनी इस्रोमध्येदेखील संशोधनाचं काम केलं. तटीय आणि सागरी प्रक्रिया आणि सागरी वातावरणाचा प्रभाव आणि तटीय भूरूपशास्त्र्ा (जिओमॉर्फोलॉजी) आणि धोके या क्षेत्रातील त्यांचं संशोधन कार्य सर्वत्र नावाजलेलं आहे.

शास्त्र्ाज्ञ म्हणून आपल्या कारकीर्दीविषयी बोलताना त्यांनी सहा प्रमुख क्षेत्रांचा उल्लेख करून माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘आपत्कालीन व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम करताना अवघ्या दोन वर्षांच्या अवधीत  सुनामी वॉर्निंग सेंटरची स्थापना करण्यासाठी नेतृत्व केलं. त्यासाठी चार वेगवेगळय़ा मंत्रालयांशी संबंधित 14 विविध संस्थांशी समन्वय साधून संपूर्ण सूचना प्रणाली विकसित केली. स्पेस ऑप्लिकेशन सेंटरमध्ये कार्यरत असताना इंधन आणि वेळेत बचत व्हावी म्हणून संभाव्य मासेमारी क्षेत्रासाठीची पद्धत विकसित केली. त्यानंतर इन्कॉईसमध्ये   (INCOIS)  त्यात सुधारणा घडवून त्याच्या प्रसारास प्राधान्य दिलं. सागरी हवामान नौकानयनासाठी सुरक्षित असावं यासाठी संपूर्ण हिंदी महासागरासाठी सेवा सुरू केली. त्यामुळे सागराच्या लाटांची उसळण आणि उंची याची माहिती मिळणं सुलभ झालं.’’

विविध प्रकारचे डेटा बेसेस तयार करून तटीय क्षेत्र व्यवस्थापनासाठी उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून विविध अल्गॉरिदम विकसित करण्यासाठीदेखील त्यांनी विशेष प्रयत्न केले. भारतीय हवामान सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यांनी विविध समित्यांवर काम करून वैज्ञानिक धोरणाला योग्य वळण देण्याच्या कामी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. हिंदुस्थानमधील विविध उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थांच्या विविध सल्लागार आणि गव्हर्नर समित्यांवर काम करून त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनास बळकटी देण्याचं कार्य केलं. ते गोव्याच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या संशोधन सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी होते तसेच ते थिरुवनंतपुरमच्या सेंटर फॉर अर्थ सायन्स स्टडीजच्या समितीचेही अध्यक्ष होते.

विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात करीअर करण्यासाठी प्रचंड मेहनत करायला हवी. माहिती तंत्रज्ञानाची भूमिका आता अत्यंत महत्त्वाची असून कोणतंही क्षेत्र त्यामधील टुल्स वापरल्याशिवाय जागतिक दर्जाचं संशोधन करू शकणार नाही. हिंदुस्थानच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील विविध संस्था हवामान बदलाचं आव्हान पेलविण्यासाठी प्रशिक्षित आणि उत्तम तरुणांच्या शोधात आहेत. त्याचा फायदा घ्यायला हवा. देशात भूशास्त्र्ााविषयी शिक्षण संशोधनाच्या उत्तम संधी निर्माण व्हायला हव्यात. तेव्हाच नवनवीन आव्हानं पेलवणं शक्य होईल असं सांगून 66 वर्षांचे वैज्ञानिक डॉ. शैलेश नायक यांनी एक पट सर्वांसाठी खुला केला.

[email protected]