
>> विवेक दिगंबर वैद्य
शक्तिपातयोगाचे परमाचार्य व महान दत्तभक्त श्रीगुळवणी महाराज यांच्या अवतारकार्याचा परिचय करून देणारा हा लेख.
कोल्हापूर जिह्याच्या राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवड डोंगरकुशीत वसलेल्या तारळे या गावचे नारायण गुळवणी नोकरीधंद्याच्या निमित्ताने ‘कौलव’ गावी आले. येथे त्यांना प्रख्यात सत्पुरुष श्रीनारायणसरस्वती यांचा सहवास घडला. नारायण गुळवणींच्या चार मुलांपैकी सर्वात ज्येष्ठ असलेल्या दत्तात्रेयपंतांचा पहिला विवाह असफल ठरला. पत्नीच्या अकाली मृत्यूनंतर हिरवडे येथील मारुतीपंत कुलकर्णी यांची मुलगी उमाबाई हिच्यासोबत दत्तात्रेयपंतांनी दुसरा विवाह केला आणि चरितार्थाच्या निमित्ताने ते पत्नीसह ‘कुडुत्री’ येथे आले.
राधानगरीचा घाटमाथा आणि भोगावती नदीची पार्श्वभूमी लाभलेला ‘कुडुत्री’ गावाचा निसर्गरम्य परिसर गहिनीनाथांच्या वास्तव्यामुळे पवित्र झालेला आहे. दत्तात्रेय व उमाबाई यांचे येथे वास्तव्य झाले. बालवयापासूनच दत्तभक्तीचे वेड असलेल्या उमाबाईंना दत्तभेटीचा ध्यास लागला. त्यांनी अन्नपाणी वर्ज्य केले. तब्बल सात दिवस पोटात अन्नाचा कण नाही की पाण्याचा थेंब नाही. त्यांचा हा ध्यास अन् पूर्वपुण्याई फळाला आली आणि त्यांच्या समोर श्रीदत्तात्रेय साक्षात प्रकट झाले. त्यांनी उमाबाईंना ‘प्रसाद’रूपाने चांदीच्या पादुका दिल्या. उमाबाईंची दत्तभक्ती इतकी प्रखर अन् जाज्ज्वल्य होती की काही वर्षानंतर त्यांना एका असाध्य व्याधीतून मुक्त करण्यासाठी श्रीदत्तप्रभूंनी साक्षात यतिवेषाने येऊन त्यांना तीर्थ दिले आणि रोगमुक्त केले. याच उमाबाईंना थोर दत्तसंप्रदायी सत्पुरुष श्रीटेंबेस्वामींचा अनुग्रह प्राप्त होता.
दत्तात्रेय व उमाबाई या गुळवणी दांपत्यास पाच मुलगे व तीन मुली होत्या. त्यांच्यातील पाचवे अपत्य ‘वामन’ हेच ‘श्रीगुळवणी महाराज’ होय. त्यांचा जन्म 23 डिसेंबर 1886 रोजी झाला. वामन यांचे मौंजीबंधनानंतरचे शिक्षण वडीलबंधू शंकरशास्त्राRकडे झाले. अभ्यासासोबत ते व्यायाम, खेळ, योगासने, चित्रकलेतही प्रवीण होते. मराठी चौथीपर्यंतचे शिक्षण गावी झाल्यावर वामन त्याच्या ज्येष्ठबंधूसह कोल्हापूरमध्ये आत्या ताराबाई पंडित हिच्याकडे आले. वामन यांचे शालेय शिक्षण राजाराम हायस्कूल अन् व्युत्पत्तीपर्यंतचे संस्कृताध्ययन पं. आत्मारामशास्त्राr पित्रे यांच्या पाठशाळेत झाले. 1907 साली मॅट्रिकची परीक्षा आणि पुढे ड्रॉईंगची सेकंड ग्रेडची परीक्षा देऊन वामन यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूलमध्ये प्रवेश घेतला. मात्र, मुंबईची हवा न मानवल्याने थर्ड ग्रेडची परीक्षा देऊन, टीचर्स ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाल्यावर ते माघारी परतले आणि राजाराम हायस्कूलमध्ये तात्पुरती नोकरी करता झाले. हाच काळ त्यांच्या जीवनाची दिशा बदलविणारा ठरला.
नरसोबाच्या वाडीहून वामन यांना ‘श्लोकबंधाचा हार घातलेल्या दत्ताचे चित्र काढून आणावे’ असा त्यांच्या वडीलबंधूंचा निरोप आला, वामन यांनी अतिशय भक्तिभावाने श्रीदत्ताचे चित्र तयार केले. तेव्हा ब्रह्मानंदस्वामींच्या मठात वास्तव्यास असलेल्या श्रीवासुदेवानंदसरस्वती यांना हे चित्र पाहून इतका आनंद झाला की, त्यांनी लगेचच एक यंत्र तयार करून वामन यांच्या हाती बांधले. वामन यांच्या चित्रकलेला झालेला हा पहिला दैवी स्पर्श. या चित्रामुळे वामन यांना मार्गदर्शक गुरू लाभले व इथूनच त्यांची सत्पुरुषपदाकडे वाटचाल सुरू झाली.
पुढे 1909 साली चातुर्मासात श्रीवासुदेवानंद टेंबेस्वामींनी वामनरावांना मंत्रदीक्षा दिली. त्यांच्याच उपदेशानुसार वामनरावांनी अनुष्ठाने व दत्तोपासना सुरू केली. एके दिवशी श्रीटेंबेस्वामींनी वामनरावांना अनुग्रहित केले आणि त्यातूनच पुढे ‘श्रीवामनराव गुळवणी महाराज’ हे शक्तिपातयोगाचे परमाचार्य म्हणून नावारूपाला गेले. श्रीगुळवणी महाराजांनी गाणगापुर येथे जाऊन मंदिराच्या कट्टय़ावर राहून, माधुकरी मागून 42 दिवसांत श्रीगुरुचरित्राचे सलग सहा सप्ताह केले. पुढे सातवा सप्ताह झाल्यावर पारणे करून ते गाणगापूरहून गुरूभेट घेण्यासाठी निघाले. गाणगापूर, विजापूर, गदग, धारवाड, बागलकोट असा प्रवास केल्यानंतर एके दिवशी हावनूर येथील श्रीत्रिपुरांतकेश्वराच्या मंदिरात ते आले असता वामनरावांची श्रीटेंबेस्वामींशी भेट घडली. श्रीटेंबेस्वामींना पाहून सर्व श्रम आणि कष्ट नाहीसे होताच श्रीगुळवणी महाराजांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. पुढे त्यांची कालक्रमणा श्रीटेंबेस्वामींसह होऊ लागली. तीन घरी भिक्षा मागणे, त्रिपुरांतकेश्वराच्या ओटय़ावर बसून शिधा ग्रहण करणे ही नैमित्तिक कार्ये बनली. भिक्षा आणल्यावर त्यातील आठ घास अन्न श्रीटेंबेस्वामी घेत व राहिलेले बाजूला ठेवत. त्यांच्या हातचा प्रसाद मिळावा ही श्रीगुळवणी महाराजांची नेहमीच इच्छा असे. एके दिवशी धाडस करून श्रीटेंबेस्वामींना त्यांनी विचारले तेव्हा श्रीस्वामींनी त्यांना होकार दिला. पुढे हावनूर येथे मुक्काम असेतोवर हा प्रसादग्रहणाचा कार्यक्रम चालू राहिला.
श्रीगुळवणी महाराज श्रीटेंबेस्वामींच्या इतके निकट होते की, त्यांच्या हातावर पाणी घालणे, उष्टे काढणे, त्यांची छाटी-लंगोटी धुऊन आणणे आदी सर्वप्रकारच्या सेवा ते करीत असत. स्नानाच्या वेळी श्रीटेंबेस्वामी पाण्याचे चार थेंब श्रीगुळवणी महाराजांच्या अंगावर उडवत. चातुर्मासाच्या काळात श्रीटेंबेस्वामींनी एकांतवासात राहण्याचे ठरविले तेव्हा त्यांच्यासोबत केवळ श्रीगुळवणी महाराजच होते. दरम्यान श्रीटेंबेस्वामींनी श्रीगुळवणी महाराजांना श्रीदत्तयंत्रातील मंत्राची तसेच गीता व विष्णुसहस्रनामाची संथा दिली. सोबतच बंधनमुक्त होण्यासाठी संप्रदायाची उपासनाही सांगितली. योगासने, प्राणायाम, मुद्रा, अजपाजप, धौतीसारख्या अप्राप्य योगक्रिया शिकविल्या आणि योग्य मुहूर्त येताच एके दिवशी दिव्यभावात जाऊन श्रीटेंबेस्वामींनी स्वतःच्या ठायी असलेल्या आत्मस्वरूप श्रीदत्तात्रेयांचे दर्शनही घडविले.
श्रीटेंबेस्वामींच्या महानिर्वाणानंतर श्रीगुळवणी महाराजांनी त्यांच्या अवतारकार्यातील बराचसा काळ श्रीगुरूंच्या प्रसारार्थ खर्च केला. पुढे काही काळानंतर पुणे येथील ‘श्रीवासुदेव निवास’ या वास्तूमधून श्रीगुळवणी महाराजांनी श्रीटेंबेस्वामींचे समग्र गंथ, कारणपरत्वे लिहिलेले साहित्य, श्लोक, टीका, मंत्र, स्तोत्र यांची हस्तलिखिते एकत्र करून ती बारा खंडांमधून प्रसिद्ध करण्याचे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य केले.
श्रीगुळवणी महाराजांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी श्रीटेंबेस्वामींना अतिशय प्रिय असलेल्या अशा ‘श्रीक्षेत्रनृसिंहवाडी’ या दत्तक्षेत्राचा जीर्णोद्धार केला. श्रीगुळवणी महाराजांनी तीर्थयात्रा, संतसंस्कार, दत्तसंप्रदायाचा व शक्तिपात विद्येचा प्रसार यांना प्राधान्य दिले. भगवंताने सांगितलेला ज्ञान, कर्म व योग या तिन्ही मार्गांपैकी योगमार्गाचा प्रसार करण्यासाठी श्रीगुळवणी महाराजांनी अनेक प्रयत्न केले. शक्तिपातयोग, सहजयोग, सिद्धयोग यांचा प्रचार केला. मुद्रा, प्राणायाम यांचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले. अत्यंत अलौकिक अवतारकार्य असलेले श्रीगुळवणी महाराज 15 जानेवारी 1974 रोजी 88 व्या वर्षी देह त्याग करते झाले. मितभाषीपणा व साध्या राहणीमानामुळे श्रीगुळवणी महाराज यांनी स्वतःला प्रसिद्धीच्या प्रकाशझोतापासून अलिप्त ठेवले असले तरीही त्यांचे कार्य अफाट, अलौकिक व महत्त्वपूर्ण आहे यात शंकाच नाही.




























































