
ऍपल आणि सॅमसंग कंपनीच्या काही मोबाईल हँडसेटमधून निर्धारित केलेल्या निकषांपेक्षा जास्त प्रमाणात रेडिओ फिक्वेन्सी (लहरी) होत आहेत. या लहरी मानवी आरोग्याला घातक असल्याचा दावा करत या कंपन्यांविरोधात अमेरिकेत खटला दाखल करण्यात आला आहे. हँडसेटमधून होणाऱ्या जास्तीच्या लहरींबद्दलची माहिती कंपनीने ग्राहकांपासून लपवून ठेवली आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
या कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्ये किती लहरी बाहेर पडतात, याची माहिती खटला दाखल करणाऱ्याने खासगी लॅबोरेटरीत चाचणी करून घेतली. यात चार कंपन्यांच्या मोबाईलमधून बाहेर पडणारे लहरी तपासण्यात आल्या. त्यात या मोबाईलसेटमधून प्रमाणापेक्षा जास्त लहरी बाहेर पडत असल्याचे आढळले.
हे आहेत मोबाईल हँडसेट
आयफोन 7, आयफोन 7 प्लस, आयफोन 8, आयफोन एक्स, सॅमसंग गॅलक्सी एस 8 आणि गॅलेक्सी नोट 8 हे फोन निकषांपेक्षा जास्त लहरी बाहेर पडत असल्याचे आढळले.
लहरी जास्त नाहीत – ऍपल
आयफोन 7 सह आमचे सर्व आयफोन एफसीसी सर्टिफाईड आहेत. जिथे हे फोन विकले जातात त्या देशांनीही त्यांना सर्टिफाईड केले आहे. आम्ही सर्व मार्गदर्शक तत्त्वे आणि मर्यादांचे पालन करतो, असे ऍपलने म्हटले आहे. सॅमसंगने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
ऍपलच्या ‘मॅकबुल’ला विमानबंदी
ऍपलच्या मॅकबुक लॅपटॉपवर विमान बंदी घालण्याचा निर्णय परदेशी विमान कंपन्यांनी घेतला आहे. मॅकबुकच्या सदोष बॅटरीमुळे लॅपटॉप पेटण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे विमानसह इतर प्रवाशांच्या जीवाला धोका नको, म्हणून परदेशी विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. परदेशी विमान कंपन्यांनी मॅकबुल प्रोवर बंदी घातली असली तरी हिंदुस्थानी विमान कंपन्या आणि विमान प्राधिकरणाने त्यावर बंदी घातलेली नाही.






























































