मुंबईकरांना उकडू लागले,  बर्‍याच दिवसांनी परतला ‘सन डे’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तळ ठोकून राहिलेल्या पावसामुळे हातात छत्री ठेवण्याची सवय लावून घेतलेल्या मुंबईकरांना रविवारी पावसाऐवजी घामाच्या धारांनी चिंब भिजवले. गेल्या आठवडय़ात धो-धो कोसळून मुंबईकरांच्या बाहेर फिरण्याच्या प्लॅनिंगवर पाणी फेरणारा पाऊस रविवारी ‘गुल’ झाला. शहरात बर्‍याच दिवसांनी सूर्यदर्शन झाले, मात्र तापमानात अचानक 3 अंशांची वाढ झाल्यामुळे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेले मुंबईकर घामाघूम झाले.

सप्टेंबर संपत आला तरी पावसाने शहरातून काढता पाय घेतलेला नाही. अधूनमधून जोरदार हजेरी लावणार्‍या पावसाने ‘आता बस्स करावं’, अशी प्रतिक्रिया मुंबईकरांच्या तोंडून बाहेर पडत आहे. रविवारी जणू मुंबईकरांची हीच विनवणी ऐकून पाऊस गुल झाला. त्यामुळे शहर व उपनगराच्या तापमानात वाढ झाली. पावसाच्या हजेरीमुळे सरासरीच्या खाली राहिलेल्या कमाल तापमानाने रविवारी सांताक्रुझमध्ये तीन अंशांची उसळी घेत 33.6 अंशांची पातळी गाठली. कुलाब्यातही 31 अंश इतके तापमान नोंद झाले. शनिवारच्या तुलनेत दोन्ही ठिकाणचे तापमान चढेच राहिले. शनिवारी सांताक्रुझमध्ये 32.6 अंश कमाल तापमान होते. या तापमानवाढीमुळे मुंबईकरांना  घामाघूम व्हावे लागले.

पावसाची ‘एक्झिट’ नाही!

तापमान वाढले असले तरी शहरातून पावसाने माघार घेतलेली नाही. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे शहर व उपनगरात पुढील काही दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस अधूनमधून पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

कमाल तापमान

                 शनिवार रविवार

सांताक्रुझ            32.6    33.3

कुलाबा              30.4     31.0