
पाकिस्तानसोबत चर्चेच्या सर्व शक्यता हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी फेटाळून लावल्या आहेत. जम्मू-कश्मीरमधून कलम 370 रद्दबातल झाल्यापासून पाकिस्तानचा जो आकांडतांडव सुरू आहे याबाबत न्यू यॉर्कमध्ये बोलताना जयशंकर यांनी द्विपक्षीय चर्चेच्या शक्यतांना पूर्णविराम दिला. रात्री दहशतवाद्यांचा नंगानाच आणि दिवसा क्रिकेट शक्य नसल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून दोन्ही देशांमधील क्रिकेट पूर्णत: बंद करण्यात आले होते. फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये दोन्ही संघ एकमेकांशी भिडतांना दिसले.
पाकिस्तान हा एक आव्हानात्मक शेजारी आहे, जो दहशतवादाला आपली पॉलिसी मानून पुढे चालत राहिला आहे, असे एस. जयशंकर म्हणाले. पाकिस्तानसोबत क्रिकेटवर बोलताना जयशंकर म्हणाले की, याबाबतीत देशातील नागरिक काय म्हणतात हे महत्त्वाचे आहे आणि त्याला नजरअंदाज करू शकत नाही. कोणत्याही लोकशाही राष्ट्रामध्ये जनभावना महत्त्वाची असते. रात्री दहशतवाद आणि दिवसा चर्चा शक्य नाही. पाकिस्तान नेहमीच हिंदुस्थानवर दबावासाठी दहशतवादाचा वापर करत आलेला आहे, असेही ते म्हणाले.
दोन्ही देशात कश्मीरच महत्त्वाचा मुद्दा नाही
थिंक टँक कार्यक्रमात एस. जयशंकर यांनी कश्मीर आणि नवी दिल्लीचे इस्लामाबादच्या संबंधांबाबत विचारण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, दोन्ही देशातील हाच एक महत्त्वाचा मुद्दा नाही. अनेक मुद्द्यांमधील हा एक मुद्दा आहे. तसेच पाकिस्तानसोबत चर्चा करण्यास हरकत नाही, परंतु जो देश दहशतवादाला पोसत आहे त्यांच्याशी चर्चा कशी होऊ शकते, असेही ते म्हणाले. जोपर्यंत ते दहशतवादाचा मुद्दा गंभीरतेने घेत नाही, तोपर्यंत चर्चा होऊ शकत नाही.



























































